लोकसभा निवडणुकीपूर्वी तापी मेगा रीचार्ज प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन ; बर्‍हाणपूरात भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा

रावेर (शालिक महाजन)- आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी तापी मेगा रीचार्ज प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शनिवारी केली. बर्‍हाणपूर शहरातील लालबाग जवळील सागर टॉवर मैदानावर नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशिराने सभेला प्रचंड कडेकोट बंदोबस्तात सुरुवात झाली. प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट असून या योजनेमुळे जमिनीच्या भूजल पातळीत वाढ होणार असून मध्यप्रदेशासह महाराष्ट्रातील शेतकर्‍यांवर आलेले जलसंकट दूर होणार आहे. या योजनेच्या सर्वेक्षणाचे कामदेखील सरकारमार्फत पूर्ण झाले असून डीपीआर सुध्दा तयार झाला असल्याचे ते म्हणाले.

मध्यप्रदेशातील मुख्यमंत्र्यांच्या कामाचा गौरव
बर्‍हाणपूर विधानसभेच्या उमेदवार अर्चना चिटणीस यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सभा झाली. याप्रसंगी फडणवीस यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहाण यांच्या कार्याची तोंडभरून स्तुती करीत त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली असल्याचे सांगत त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असल्याचे सांगितले. तापी मेगा रीचार्ज प्रकल्पावर महाराष्ट्र सरकार, मध्यप्रदेश आणि केंद्र सरकार काम करीत आहे. आतापर्यंत या सर्वेक्षणाच्या कामावर 22 कोटी रुपये खर्च झाले असून सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले. काँग्रेसच्या कार्यपद्धत्तीवर त्यांनी चांगलीच टिका करीत मोदी सरकारने गेल्या चार वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती दिली.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता सैय्यद शाहनवाज हुसैन, खासदार सी.आर.पाटील, भाजपा विधानसभा उमेदवार अर्चना चिटणीस, महिला अध्यक्षा वैशाली पाटील, भाजपा जिल्ह्या उपाध्यक्ष तथा बर्‍हाणपूर प्रभारी पद्माकर महाजन, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, संगीता पाटील, अनिल भोसले, मनोज टारवाला, किशोर पाटील, अरुण शिंदे, रमेश पाटीदार, ज्ञानेश्‍वर मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Copy