लोकसंग्राम पक्षाबाबत जनतेचा कौल घेणार्‍या विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी झोडपले

0

पोलिस यंत्रणा सत्ताधार्‍याकडे गहाण ठेवली आहे का ? आमदार गोटे यांचा पोलिसांना सवाल

धुळे- आमदार अनिल गोटे आणि त्यांच्या मुलगा तेजस गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाबाबत जनतेचा कौल काय आहे? याबाबत औरंगाबाद येथील महाविद्यालयतील विद्यार्थी सर्व्हे करीत होते. त्यांना वखारकर नगर भागात शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. आमदार गोटे यांनी आझाद नगर पोलीस ठाण्यात हजेरी लावली. यावेळी त्यांनी पोलिसांना सुनावले. पोलिस यंत्रणा सत्ताधार्‍याकडे गहाण ठेवली आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. विद्यार्थ्यांना कोणी मारहाण केली? हे अद्याप समोर आले नाही. याठिकाणी जमाव होता, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.

सर्वे करणार्‍या विद्यार्थ्यांना झोडपले
सोमवारी सकाळी 11 वाजता आमदार अनिल गोटे यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांना फोन आला की, शहरातील वखारकर नगर भागात शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी सर्व्हे करणार्‍या र् विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांनी धुळे शहराचे डीवायएसपी सचिन हिरे यांना फोन केला. शहरातील वखारकार नगर भागात विद्यार्थ्याना मारहाण करण्यात आली आहे. काहींना डांबून ठेवण्यात आले आहे. घटनेची माहिती घेवून तत्काळ कारवाई करा, अशी विनंती आमदार गोटे यांनी केली. औरंगाबाद येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एका कंपनीच्या माध्यमातून धुळे शहरातील निवडणूकीचे सर्व्हेक्षण करण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्यात आमदार अनिल गोटे आणि त्यांच्या मुलाचा लोकसंग्राम पक्ष याबाबत जनतेचा कौल काय आहे ? याबाबत हे विद्यार्थी सर्व्हेक्षण करीत होते. वखारकर नगर भागात काही शिवसैनिकांनी या विद्यार्थ्यांना गाठले. त्यांना मारहाण केली. सर्व्हेक्षणाचे काम करणर्‍या र् अन्य विद्यार्थ्यांनी आ. गोटे यांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क केला. घडलेली हकीकत सांगितली, कार्यकर्त्यांनी ही माहिती आ.गोटे यांना सांगितली.

विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याची मागणी
घटनेची माहिती मिळताच आमदार गोटे यांनी डीवायएसपी सचिन हिरे यांना मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याची विनंती केली. विद्यार्थ्यांना आझाद नगर पोलिस स्टेशनला आणण्यात आले. आमदार गोटे ही आझाद नगर पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांनी मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली. विद्यार्थ्यांना कोणी मारहाण केली? त्यांची माहिती त्यांनी घेतली. विद्यार्थी शहरात नविन असल्याने त्यांना सांगता आले नाही मात्र आ.गोटे यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ओळखले होते. पोलीस स्टेशन मध्ये आमदार गोटे यांनी पोलिसांना चांगलचे सुनावले. याप्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.