Private Advt

लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ; नैराश्यातून जळगावात तरुणीची आत्महत्या

0

जळगाव: कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. बांधकाम मजुर असलेले वडीलांचे या लॉकडाऊनमुळे काम बंद झाले. त्यामुळे रोजगाराचे दुसरे साधन नाही. काही संस्थांसह समाजसेवकांकडून काही दिवस जेवणाचे पाकिट मिळाले. मात्र नंतरही तेही बंद झाले. त्यामुळे आता वडीलासह तीन भावंड व आपला उदरनिर्वाह कसा होईल या नैराश्यातून अनिता खेमचंद चव्हाण (वय 17 रा. रायसोनी नगर, मूळ रा. मध्यप्रदेश) या मुलीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली.

वडील, भाऊ मदतीसाठी पडले घराबाहेर अन्..
चव्हाण कुटूंब मूळ मध्यप्रदेश येथील असून उदरनिर्वाह करण्यासाठी जळगावला आले आहेत. खेमचंद चव्हाण यांची पत्नी वारली असून एक मुलगी व तीन मुलांसह ते रायसोनी नगर येथे एका झोपडीत राहत होते. या परिसरात सुरु असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी खेमचंद चव्हाण रोजंदारीवर बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. मात्र कोरोनाने सर्वत्र लॉकडाऊनमुळे खेमचंद चव्हाण यांचे हातचे कामही गेेले. मोठा भाऊ हतबल झाल्याने पोटाची खळगी भरायची कशी ? अशा विवंचनेत अनिता होती.शनिवारी रात्री वडील व मोठा भाऊ कुठे काही मदत मिळते काय याचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडले. लहान भावंडे घराबाहेर खेळत होती. यावेळी अनिता हिने घरात एकटे असल्याची संधी साधत छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. व आपली जीवनयात्रा संपविली. बाहेरुन भाऊ व वडील परत आल्यानंतर त्याला प्रकार लक्षात आला. या परिसरात वास्तव्यास असलेले शिवसेनेच्या मंगला बारी यांना प्रकाराची माहिती मिळाली. त्यांनी याबाबत रामानंदनगर पोलिसांना कळविले. यानंतर अनिताला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण पाटील यांनी तिला मृत घोषित केले.

मृत्यूनंतरही अडचणींचा पाठलाग सुरुच
सामाजिक कार्यकर्त्या मंगला बारी यांनी रविवारी सकाळी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्याचे अनिल फेगडे यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनेचा पंचनाम्याची क ागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली. यानंतर बारी यांनी जिल्हा रुग्णालय गाठले. शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेतला. व रुग्णवाहिकेतून घरी हलविला. यानंतर बारी यांनी वार्डातील लोकप्रतिनिधींसह अनेकांना फोन केले. एक जण दुसर्‍याचा मोबाईल क्रमांक देत होते. यामुळे तब्बल चार तास मृतदेह घरीच पडून होता. अखेर बारी यांनी त्यांच्या मंडप व्यावसायासाठी असलेल्या मालवाहू वाहनातून मृतदेह स्मशानभूमित हलविला. नेरीनाका येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. थोडक्यात मृत्यूनंतरही अनिताचा समस्या, अडचणी जणू पाठलागच करत होते, याचा प्रत्यय शववाहिका न मिळाल्याने आला.

जागतिक मातृदिन अन् असाही योगायोग
रविवारी जागतिक मातृदिन अन् आई नसलेल्या अनितासाठी मंगला बारी या आई बनल्या, असा योगायोगही यावेळी घडला. पंचनाम्याची प्रक्रिया, मृतदेह आपल्या वाहनातून स्मशान भूमित हलविणे, यासह अनितावर अंत्यसंस्कारावेळी बारी यांनी आई बनून सर्व भूमिका पार पाडली. असा योगायोगही यावेळी पहायला मिळाला. यातून बारी यांनी मुलगा आपला असो की दुसर्‍याचा त्यासाठी महिलेची माया प्रेम कधीही आटत नाही. ते कमी पडता कामा नये, असा भावनिक संदेशही जागतिक मातृदिनी समाजाला दिला.