लॉकडाऊनमध्ये बांधकाम : माजी पदाधिकार्‍यास लाखांचा दंड

0

भुसावळ मुख्याधिकारी करुणा डहाळे यांचा आक्रमक पवित्रा : मास्क न बांधणार्‍यांना दंड : सोशल डिस्टन्स न पाळणार्‍या भाजीपाला विक्रेत्यांना हटवले

भुसावळ : शहरातील मुख्य बाजारपेठ भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकूलाजवळील एका माजी नगराध्यक्षांच्या हॉटेलचे पहिल्या मजल्याचे बांधकाम लॉकडाऊनच्या काळात सुरू असल्याने भुसावळच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी करुणा डहाळे यांना ही बाब कळताच त्यांनी पथकासह मंगळवारी धाव घेवून हे काम बंद पाडले तसेच बांधकामावरील साहित्य ज्प्त करून संबंधित माजी पदाधिकार्‍यास एक लाखांचा दंड सुनावण्यात आल्याने राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नियम धाब्यावर ठेवून बांधकाम
संचारबंदीच्या या काळात केवळ जीवनावश्यक वस्तू व औषधे विक्री, दवाखाने आदी वगळता इतर सर्व उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत मात्र शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संकुलाजवळ पालिकेच्या एका माजी पदाधिकार्‍याने नियम धाब्यावर बसवत बांधकाम सुरू केले होते. गेल्या तीन दिवसांपासून अनेक सर्वसामान्य नागरिकांनी हा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केले. मंगळवारी पालिकेच्या मुख्याधिकारी व पथकाने बांधकामस्थळी जावून हे बांधकाम बंद पाडत साहित्य जप्त केले तसेच संबंधितास एक लाखांचा दंडही सुनावण्यात आला.

टीव्ही टॉवरवरील 60 विक्रेते नवजीवन कॉलनीत विकणार भाजीपाला
शहरातील टीव्ही टॉवर मैदानावर भाजीपाला बाजार सुरू करण्यात आला असलातरी येथे सोशल डिस्टन्स न पाळले जात असल्याने मुख्याधिकार्‍यांनी मंगळवारी येथे धाव घेत काही विक्रेत्यांचे साहित्य जप्त केले तसेच मास्क लावून न आलेल्या नागरीकांवरही दंडात्मक कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. टीव्ही टॉवरवरील 60 विक्रेत्यांना आता नवजीवन कॉलनीत भाजीपाला विक्रीस परवानगी देण्यात आली आहे शिवाय सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचे आवाहन विक्रेता तसेच नागरीकांना करण्यात आले आहे.

Copy