लॉकडाऊनमध्येही अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसीलदारांनी पकडले

0

रावेर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन व सारी जनता एकवटली आहे. नागरीकांची रस्त्यांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी व लॉक डाऊन सारखे उपाय योजना राबविण्यात येत असून सर्वाना घरात थांबण्याचे वारंवार आवाहन केले जात असतांना याच काळात तालुक्यात वाळूची अवैध वाहतूक वाळू माफियाची मुजोरी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी हाणून पाडली आहे. आंदलवाडी येथून अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर त्यांनी पकडले असून ते निंभोरा पोलिसांत कारवाईसाठी जमा करण्यात आले आहे.

तहसीलदारांच्या कारवाईने उडाली खळबळ
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने केलेल्या लॉकडाऊनची पाहणी करण्यासाठी तहसीलदार उषाराणी देवगुणे या कर्मचार्‍यासह तालुक्यातील ग्रामीण भागात फिरून गावांना भेटी देत होत्या. त्यांनी सावदा, निंभोरा, लहान वाघोदा, मस्कावद, आंदलवाडी या गावांना भेटी देऊन तेथील लॉकडाऊनची पाहणी केली तसेच या गावातील राशन दुकानांना भेटी देऊन दप्तराची व वाटप केल्या जाणार्‍या धान्याची माहिती घेतली. सोशल डीस्टनसिंग व इतर नियमांचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी राशन दुकानदार व ग्राहकांना दिल्या. दरम्यान, आंदलवाडी येथून परतत असतांना एका ट्रॅक्टरद्वारे वाळूची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याचे दिसून आल्याने सदरचे ट्रॅक्टर त्यांनी निंभोरा पोलिसांत कारवाईसाठी जमा केले असून या वाहनाविरूढ गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सर्वत्र लॉक डाऊन असतांना अवैध वाळूची वाहतूक करण्याच्या या घटनेची मात्र आता चर्चा आहे.

Copy