लॉकडाऊनच्या निमित्ताने वीज ग्राहकांची लूट

0

भुसावळ : भुसावळ शहरासह जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले तर प्रत्यक्षात रीडींग घेतले गेले नसल्याने सरासरी वीज बिलाची मागील वर्षाची तुलना करून शक्कल लढवून वीज ग्राहकांकडून वीज बिल आकारण्यात आले मात्र आता लॉकडाऊन अन लॉक होताच वीज बिल ग्राहकांना दिले जात आहे. सरासरी बिल दिल्यानंतर जून महिन्यात अक्षरशः बिलाची चौपट आकारणी केली गेली. एक प्रकारे वीज ग्राहकांची फसवणूक झाली असून महावितरणमध्ये युनिटमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप शिशिर जावळे यांनी केला आहे.

चौपट वीज आकारणीमुळे ग्राहक संतप्त
मार्च, एप्रिल, मे, महिन्याचा दरमहा विजेचा भरणा केल्यानंतरही लॉकडाऊन ग्राह्य धरून जून महिन्यात विजेचे युनिट चौपट आकारणी करून वीज बिल ग्राहकांना दिले आहे. नियमित भरणा केल्यानंतरही जून महिन्याचा अव्वाच्या सव्वा बिल पाहून ग्राहकांना शॉक लागला आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरीकांना आता एवढे मोठे बिल कसे भरावे ? असा प्रश्‍न पडला आहे.

उन्हाळ्यात वीज वापर अधिक : वीज कंपनी
जून महिन्याच्या बिलाची आकारणी करताना मागील वर्षी एप्रिल, मे, जून महिन्याची आणि यावर्षी याच महिन्यात लॉकडाऊन असल्यामुळे तसेच उन्हाळा असल्याने विजेचा अधिक वापर झाल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. महावितरण कंपनीकडून सातत्याने ग्राहकांची पिळवणूक होत असल्याचे सर्वश्रृत असून आजपर्यंत तक्रारींना केराची टोपली दाखवण्याचं काम महावितरणने केले असल्याचा आरोपही जावळे यांनी केला आहे. कोरोनासदृश्य गंभीर परीस्थितीमुळे दिल्लीसारख्या राज्यांमध्ये सरासरी फक्त शंभर रुपये बिल आकारले जात आहे. मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे सर्वच ग्राहक त्रस्त आहेत. जळगाव जिल्ह्यातील सरासरी बिलांच्या दर आकारणीसंदर्भात गंभीर दखल घेऊन जिल्ह्यातील सर्व वीज ग्राहकांच्या बिलांचे तसेच जिल्ह्यातील महावितरणकडे येणार्‍या सर्व तक्रारींचे सुद्धा स्पेशल ऑडिट करून चौकशी करण्याची मागणी प्रधानमंत्री जनकल्याण योजना प्रचार व प्रसार समिती जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष शिशिर दिनकर जावळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग, यांच्याकडे केली आहे.