लॉकडाऊनचे उल्लंघन ; जिल्ह्यात 3 हजार 242 गुन्हे दाखल

0

जळगाव – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तींवर जळगाव पोलीस दलातर्फे धडक कारवाई करण्यात येत आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आतापर्यंत विनाकारण बाहेर फिरणे, विना परवाना दुकान उघडले, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, सोशल मिडीयावरुन अफवा पसरविणे यासह अवैध मद्य विक्री अशा विविध बाबींचे उल्लंघन करणार्‍यांवर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण 3242 गुन्हे दाखल झाले आहे. या कारवाईत पोलिसांनी 493 दुचाकी 105 ऑटोरिक्षा व 26 चारचाकी अशी वाहने जप्त केली असल्याची माहिती अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिली आहे. तसेच नागरिकांमध्ये जनजागृतीसह विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ड्रोन कॅमेर्‍याचा वापर करुन त्यानुसार बंदोबस्तांची आखणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या 36 दिवसात 3 हजार 242 गुन्हे

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 मे, 2020 पर्यंत देशभर लॉकडाऊन घोषित केलेला आहे. राज्यात लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहे. त्यानुसार जिल्हा पोलीस दलाच्यावतीने लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने लॉकडाऊनच्या कालावधीत काही निर्बेध घालून दिलेले आहेत. तरीसुध्दा जिल्ह्यातील काही नागरिक बेफिकिरपणे वागत असून स्वत:बरोबरच दुसर्‍यांच्याही जीवाला कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण करीत असल्याचे दिसून येत आहेत. याला आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिस दलाकडून अशा व्यक्तींवर कारवाईची धडक मोहिम हाती घेतलेली आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात विविध कारणांनी भारतीय दंड विधान संहिता कलम 188, 269, 270 आणि 290 तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा 2 ते 4 सह आपत्ती व्यवस्थापन कलम 54(4) आदिंचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत 3242 गुन्हे दाखल झाले आहेत.

कलम 188 चे उल्लंघन, असे आहेत गुन्हे

मास्क न लावणे-343, विना परवाना दुकान उघडणे-142, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे-57, दुसर्‍या जिल्ह्यातून अनधिकृतपणे प्रवेश करणे-59, सोशल मिडीयावरून अफवा पसरविणे-19, दुचाकी वाहन डबलसिट चालविणे-422, त्याचबरोबर दुचाकी वाहन जप्त-493, ऑटोरिक्षा जप्त-105, फोर व्हिलर वाहन जप्त-26 याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय कलम 188 चा भंग केल्याबद्दल ईतर केसेस- 1011, तर दारुबंदी अंतर्गत केसेस-575 अशाप्रकारे एकूण 3242 गुन्हे दाखल करण्यात आल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी कळविले आहे.

गर्दीवर नियंत्रणासाठी ड्रोन कॅमेर्‍याचा वापर

त्याचबरोबर जिल्ह्यातील चेकपोस्ट, प्रतिबंधित क्षेत्र, कंटोन्मेंट झोन व महत्वाच्या, गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावून तेथील नागरीकांमध्ये जनजागृती करणे, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा वेळेत होण्यासाठी हेल्पलाईनच्या माध्यमातून मदत करणे, लॉकडाऊनच्या काळात नागरीकांनी मास्क लावणेबाबत जनजागृती करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे. बाजार समितीच्या व इतर गर्दीच्या ठिकाणी होणार्‍या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेर्‍याचा वापर करुन बंदोबस्ताची आखणी करणे, आदि विविध उपाययोजना पोलीस दलातर्फे राबविण्यात येत आहे.

नागरिकांनीही लॉडाऊनच्या नियमांचे पालन करुन घरातच रहावे, आवश्यकता भासल्यास स्वत:ची सुरक्षितता पाळूनच घराबाहेर पडावे. पोलीस व प्रशासनाने केलेल्या सुचना पाळूनच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे. नियमांचे पालन करणार्‍यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. – डॉ. पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक

Copy