लेह, लडाख सीमावर्ती भागात लष्कराच्या हालचालींना वेग

0

लडाख:पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी जवानांदरम्यान जोरदार संघर्ष झाले. यात 20 भारतीय जवान शहीद झालेत. चीनचे देखील मोठे नुकसान झाले असून त्यांचे 40 पेक्षा अधिक सैनिक मारले गेलेत. या झालेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कराने लेह व अन्य सीमावर्ती भागात आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. याचबरोबर लडाखमधून जे काही लष्करी युनिट माघारी येणार होते, त्यांना त्या ठिकाणीच थांबण्यास सांगण्यात आले आहे. लडाखच्या आसपास असलेल्या परिसरात तैनात असलेल्या लष्करी युनिट्सला लेहमध्ये कधीही पोहचण्यास सज्ज राहण्याचेही आदेश दिले गेले आहेत. विशेषत: जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या युनिट्सना कोणत्याही क्षणी लेहला जाण्याचे आदेश दिल्या जाऊ शकतात.

लडाखमध्ये सीमेलगत असलेली गावे रिकामी करण्याची तयारी सुरू झाली आहे. लष्कराकडून गावकऱ्यांना तशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. देमचोक व पँगाँग परिसरातील वस्त्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. याशिवाय सीमेलगतच्या लेह सिटी बाहेर सैन्या व्यतिरिक्त सर्व हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे. श्रीनगर-लेह महामार्ग सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, लष्कराच्या अधिकारी व जवानांच्या सुट्टया देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

चीनला लागून असलेल्या ३५०० किलोमीटरच्या प्रत्यक्ष सीमेलगतच्या भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या तळांना सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्यदल प्रमुख जनरल बिपिन रावत, तसेच तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत घेतलेल्या बैठकीत तिन्ही सैन्यदलांचा दक्षतेचा स्तर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.