लायन्स क्लबच्या सायकल दत्तक योजनेला प्रतिसाद

0

तळेगाव : सायकल दत्तक योजना या आवाहनाला दाद देत अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या जवळील वापरात नसलेली सायकल लायन्स क्लब ऑफ वडगाव यांना देऊ केली, अशा सुमारे 50 सायकल लायन्स क्लब ऑफ वडगावच्या वतीने दुरुस्त करून वापरात आणल्या गेल्या. यावेळी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांनी उपक्रमासाठी मदतीचा हात देणार्‍या नागरिकांचे कौतुक केले. सायकल असल्यामुळे विद्यार्थी आपला वेळ वाचवू शकतो व यामुळे प्रदूषणास देखील आळा बसेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

या मान्यवरांची उपस्थिती
मावळ, मुळशी तालुक्यातील गरजू व लांब अंतराहून शाळेत सुमारे 3 किमी पायी येणार्‍या विद्यार्थी, विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम यांची उपस्थिती होती. गटविकास अधिकारी नीलेश काळे, गटशिक्षण अधिकारी संजय तांबे, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, लायन्स क्लब ऑफ वडगावचे अध्यक्ष आदिनाथ ढमाले, लायन्स क्लबचे सार्वजनिक आरोग्य आणि कुपोषणमुक्त पुणे जिल्ह्याचे प्रांतप्रमुख भूषण मुथ्था, सहाय्यक गटविकास अधिकारी अप्पासाहेब गुजर, विस्तार अधिकारी एम.एम. कांबळे, सुधाकर म्हंकाळे आदी उपस्थित होते.

दानशूरांनी पुढे यावे
कार्यक्रमाचे संयोजन लायन्स क्लब ऑफ वडगावचे सचिव संजय भंडारी, संचालक प्रदीप बाफना, प्रदीप बाफना, नंदकिशोर गाडे, बाळासाहेब बोरावके, अमोल मुथा, गांधी, मुश्ताक शेख आदींनी केले होते. गटशिक्षण अधिकारी संजय तांबे यांनी विद्यार्थ्यांची होणारी पायी फरपट थांबणार असून निकषात बसत नसलेल्या गरजू विद्यार्थ्यांनाही संस्थेच्या विनंतीवरून सायकली दिल्या असल्याचे सांगितले. उपसभापती शांताराम कदम यांनी ही मनोगत व्यक्त केले. सायकल भेट मिळालेल्या एका विद्यार्थिनीनेही आपल्या भावना व्यक्त केल्या. देणगीदार डॉ. दडके यांनी समाजातील इतर दानशूर व्यक्तींनीदेखील अशा प्रकारच्या उपक्रमास सहकार्य करण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण मुथा यांनी तर आभार आदिनाथ ढमाले यांनी केले.