लाडशाखीय वाणी समाजाला राजकीय संरक्षण हवे – धनंजय मुंडे

0
समाजाच्यावतीने आयोजित दोन दिवसीय महाअधिवेशनाचे आयोजन
हिंजवडी : अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाच्या महाअधिवेशनास आल्यानंतर एक लक्षात आले आहे. या समाजाला आरक्षण नाही तर राजकीय संरक्षण हवे आहे. यापुढील काळात लाडशाखीय वाणी समाजाला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न करू. मुख्यमंत्र्यांनी मागील साडेचार वर्षात महाराष्ट्रातील जनतेला अनेक आश्‍वासने दिली. परंतु, हे आश्‍वासन पूर्ण करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी पाठपुरावा करेल, असे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी जाहीर केले. लाडशाखीय वाणी समाजाच्यावतीने आयोजित दोन दिवसीय अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाचे महाअधिवेशनाचे उद्घाटन झाले. पहिल्या दिवसाच्या सत्राच्या समारोपप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुंडे बोलत होते. यावेळी विधान सभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार राजू शेट्टी, अधिवेशनाचे कार्याध्यक्ष कैलास ाणी, स्वागताध्यक्ष आर.एन.वाणी तसेच अनिल चितोडकर, निलेश पुरकर, राजेश कोठावदे, श्यामकांत शेंडे, राजेंद्र मालपुरे, विलास शिरोडे, कल्पेश भुसे, राजेंद्र पाचपुते आदींसह राज्यभरातून आलेले 40 हजारांहून जास्त समाज बंधू-भगिनी उपस्थित होते. यावेळी प्रा.डॉ.जगदीश चिंचोरे, व्हा.डमिरल सुनिल भोकरे, जयंत वाणी, सुनील भामरे यांचा विशेष उल्लेखनिय कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
एकी टिकवणे अवघड
धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, 28 वर्षांनंतर लाडशाखीय वाणी समाजाचे महा अधिवेशन होत आहे. याचा मनस्वी आनंद आहे. मराठी माणूस एकत्र येणे ही दुर्मिळ गोष्ट आहे आणि एकी टिकवणे फार कठीण काम असते. वाणी समाजाने हे आव्हान पेलत सर्वांना पुन्हा एकत्र बांधले याचे कौतुक वाटते. वाणी समाज काही मागण्यापेक्षा समाजाला काही देण्यासाठी पुढे असतो. त्यामुळेच हा समाज ज्या प्रदेशात, देशात जातो. तेथे एकरूप होऊन आपले कर्तव्य पार पाडत असतो. स्वतःचा विकास करतानाच इतरांना ही बरोबर घेऊन त्यांना अनेक उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात वाणी समाज अग्रेसर आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाणी समाजाची संख्या अधिक आहे. या शहराच्या नव्हे तर देशाच्या जडण घडणीत समाजाचा मोठा वाटा आहे. पांडुरंग शास्त्री आठवले, प्रसाद महाराज, अंमळनेरचे महाराज, विचारदास महाराज यांचा अध्यात्माचा वारसा जपत, धार्मिक परंपरा जोपासत वाणी समाज प्रगल्भ होत गेला.
उद्योग-व्यवसायात ठसा : राधाकृष्ण विखे
छोटे-छोटे व्यवसाय करत रिअल इस्टेटच्या व्यवसायापासून तर कारखाने, आयटी उद्योगापर्यंत लाडशाखीय वाणी समाजाने ठसा उमटवला आहे. समाजाची आतापर्यंतची वाटचाल अभिमानास्पद आहे. समाजाचा विकास व्हावा, या उदात्त हेतून अधिवेशन होत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. सध्याचे सरकार आश्‍वासनांपलीकडे काही देऊ शकत नाही. उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी समाजातील 500 विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय व्हावी, या उद्देशाने पुण्यात सरकारच्यावतीने जागा देण्यात येईल असे आश्‍वासन दिले. हे आश्‍वासन मुख्यमंत्री पूर्ण करणार का, असा प्रश्‍न आहे. परंतु, वाणी समाजाला जागा मिळण्यासाठी आम्ही विरोधीपक्ष म्हणून पाठपुरावा करु. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. केवळ पारंपरिक व्यवसायालाच महत्त्व न देता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये नवीन व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत आहेत.
राष्ट्रविकास होणार नाही : कुवळेकर
ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर सांगितले की, संपूर्ण समाजाचा जीवनस्तर उंचावल्याशिवाय राष्ट्रविकास होऊ शकत नाही. प्रत्येक प्रश्‍नाकडे आपण कसे पाहतो. त्यातून विकासाची दृष्टी मिळून पुढील ध्येयधोरणे ठरतात. अविनाश धर्माधिकारी म्हणाले की, मुला-मुलींवर ठराविक क्षेत्रातच करिअर करण्यासाठी दबाव आणला जातो. त्यापेक्षा त्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे. त्यांची क्षमता, उपलब्ध संधी, त्या क्षेत्रातील त्यांचे भवितव्य, कुटुंब, समाज आणि देश विकासासाठी त्यांच्या करिअरचा उपयोग या गोष्टी प्राधान्याने विचारात घेऊनच निर्णय घ्यावा. वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते म्हणाल्या की, पुण्याचा चहूबाजूंनी विकास होत आहे. त्यामुळे राहण्यायोग्य शहर म्हणून पुणे शहराने प्रथम क्रमांक मिळविला आहे. परंतू येथे वाहतुकीची आणि पायाभूत सुविधांची गंभीर समस्या आहे. यावेळी ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक राजेंद्र पाटे आणि किरण बागड यांचा समाजाच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.