लाडक्या छकुलीची गोष्ट

0

घरातले लाडावलेले मुल काहीही बरळले तरी त्याचे कौतुकच होत असते. त्यात पुन्हा असे मुल मुळातच कौतुकाचे असेल, तर त्याच्या बेताल बडबडीलाही दाद मिळत असते. भारतीय व प्रामुख्याने राजधानी दिल्लीतील माध्यमांमध्ये नेहरू घराण्याचे कौतुक उपजतच असते. म्हणजे त्याप्रकारचे कौतुक नसेल, तर कोणालाही दिल्लीच्या माध्यमात व पत्रकारितेत स्थान मिळू शकत नाही. सहाजिकच गांधी घराण्यातल्या कोवळ्या अर्भकाचेही सातत्याने अप्रुप सांगत बसण्याला राजकीय अभ्यास मानले जाणे रास्तच आहे. म्हणून तर मागल्या दहापंधरा वर्षात अधूनमधून प्रियंका गांधी या राजकारणात कधी प्रवेश करणार, त्याची चर्चा होत राहिलेली आहे. पण आजवर त्यांनी राजकारणात जी काही लुडबुड केली, त्याचे मूल्यमापन करण्याची कोणाही राजकीय विश्लेषकाला गरज भासलेली नाही. कालपरवा उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणूकात समाजवादी पक्ष व कॉग्रेसच्या आघाडीसाठी प्रियंकाने प्रयास केल्यावर त्यात कसे यश मिळाले; त्याचा गुणगौरव जोरात झाला. मग पुन्हा प्रियंका व यादव स्नुषा डिंपल एकत्रित उत्तरप्रदेशात रणधुमाळी करण्याच्याही अफ़वा पिकवल्या गेल्या. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही आणि मतदानाच्या तीन फ़ेर्‍यांचा प्रचार संपताना अकस्मात प्रियंका गांधी यांनी अवतार धारण केला. जेव्हा त्यांच्या खानदानी अमेठी व रायबरेली भागातल्या प्रचाराची वेळ आली, तेव्हा प्रियंका प्रकटल्या आणि त्यांनी राजकीय अभ्यासकांना नवे बोधामृत पाजले. त्यात अनेकांना मोदींना सणसणित चपराक बसल्याचाही साक्षात्कार झाला. कारण प्रियंकानी मोदींचे ‘दत्तक‘विधान उरकले होते. मोदींना कोणीही जरा काही बोचणारे बोलले, की मोदींना थप्पड बसल्याचा हा साक्षात्कार तब्बल चौदा वर्षे जुना आहे. त्यामुळे़च प्रियंकाने काहीही बोलले तरी ती चपराक बसणारच होती. म्हणूनच प्रियंकाच्या विधानाचा अर्थ शोधण्याची कोणाला गरज वाटली नाही.

वाराणशी येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी उत्तरप्रदेशचा दत्तकपुत्र आहे. असे मोदींनी कशाला म्हणावे? तर कॉग्रेस समाजवादी आघाडी झाल्यावर त्याच्या दोन्ही प्रमुख नेत्यांना ‘युपीके लडके’ म्हणून प्रसिद्धी देण्याचा सपाटा लावला गेला. आता हेच दोन्ही उत्तरप्रदेशी मुलगे मिळून त्या राज्याचे कल्याण करून टाकणार, असा प्रचार सुरू झाला. थोडक्यात उत्तरप्रदेशचा तरूण म्हणजे अखिलेश व राहुल, असा आभास उभा करण्याचा तो प्रचार होता. हे दोघे उत्तरप्रदेशचे भूमीपुत्र आहेत आणि त्या राज्याला अन्य कुणा नेत्याची गरज नाही, असे त्यातून सुचित करायचे होते. सहाजिकच त्यालाच उत्तर देण्यासाठी उत्तरप्रदेशातून निवडून आलेले असल्याने, मोदी यांनी स्वत:ला उत्तरप्रदेशचा दत्तकपुत्र ठरवून आपली भूमिका मांडली. त्यावर उत्तरप्रदेशची वा संपुर्ण भारतीय माध्यमांची छकुली म्हणून परिचित असलेल्या प्रियंकाने आपले बहूमोल मतप्रदर्शन केले. मोदी जिथे जातात तिथे आपले नाते जोडतात. आताही त्यांनी उत्तरप्रदेशचा दत्तकपुत्र होण्याचे नाटक चालवले आहे, असे प्रियंकाला खोचक बोलायचे होते आणि त्या बोलल्या. उत्तरप्रदेशच्या भूमीला आपले पुत्र नाहीत काय? या भूमीला दत्तकपुत्राची गरज आहे काय? असा सवाल करून प्रियंकाने अखिलेश व राहुल हे पुत्र, मायभूमीचा उध्दार व विकास करतील असे सुचित केले. लगेच मोदींचे दत्तकविधान रद्दबातल करून तथाकथित पत्रकार विद्वानांनी लाडकी छकुली प्रियंका हिच्या शब्दांचे गुणगान सुरू केले. पण त्यातला जो बोचरा सुर होता, तो तिच्यावरही नेमका उलटू शकतो, याचे कोणाला स्मरण राहिले नाही. कौतुकात रममाण झाले, मग विवेकबुद्धी क्षीण होणारच. मग प्रियंका किती निरर्थक बोलली, ते लक्षात तरी यायचे कसे? ज्या शब्दांचे बोचकारे या कन्येने मोदींवर काढले आहेत, तेच तिच्या खानदानी व पक्षीय दुखण्यावरची खपलीही काढणारे आहेत. त्याचे काय?

उत्तरप्रदेशच्या भूमीचा उद्धार करण्यासाठी वा विकासाचे पांग फ़ेडण्यासाठी कुणा परप्रांतिय पुत्राला दत्तक घेण्याची गरज नसेल, तर मग तेच राज्य ज्या भारतीय संघराज्याचा घटक आहे, त्या मायभूमीच्या विकासासाठी परकीय महिलेची तरी गरज असते काय? एका परदेशी महिलेने जिर्णोद्धारासाठी अध्यक्ष पदावर आणून बसवण्याची गरज कॉग्रेसला कशाला भासते? उत्तरप्रदेशला अन्य प्रांतातला कुणी होतकरू मुलगा दत्तक म्हणून घेण्याची गरज नसेल, तर भारताला स्वातंत्र मिळवून देणार्‍या शतायुषी पक्षाला तरी परदेशी आई दत्तक कशाला घ्यावी लागते, असा तर्कशुद्ध प्रश्न प्रियंकाला विचारला जायला हवा ना? सोनियांची या देशाला वा कॉग्रेस पक्षाला काय गरज होती? या देशात शरद पवार, राजेश पायलट, चिदंबरम वा मनमोहन सिंग यासारखे भूमीपुत्र उपलब्ध नव्हते काय? त्यांना कटाक्षाने बाजूला फ़ेकून कॉग्रेसने सोनिया गांधींना अध्यक्ष पदावर आणुन बसवण्याचे काय प्रयोजन होते? जगात पुढल्या पिढीसाठी दत्तक घेतले जाण्याची पद्धत आहे. पण कॉग्रेसला तर मागल्या पिढीचे आई वा बाप दत्तक घेण्याची गरज कशाला भासली? सलमान खुर्शीद यांनी तर एका प्रसंगी सोनियाची आमची माता असल्याचे जाहिरपणे सांगितले होते. मग त्यांना जन्म देणारी कोणी माता नव्हती, म्हणून त्यांनी परदेशातून मातेला आयात केले होते काय? उत्तरप्रदेशी जनता वा मतदाराला असले प्रश्न विचारण्यापुर्वी, पत्रकारांच्या लाडक्या छकुलीने स्वत:च्या मनाला वा सलमान खुर्शीद यांना असा प्रश्न विचारला असता, तर गोंधळ उडाला नसता ना? उत्तरप्रदेशच्या उद्धारासाठी गुजरातचा मुलगा येण्याची गरज नसते. पण देशाधडीला लागलेल्या कॉग्रेस पक्षाचा जिर्णोद्धार करण्यासाठी मात्र इटालीची बेटी भारताला आणावी लागते. यातला तर्क कुणा अभ्यासकाने जर स्पष्ट करून टाकला तर खुप बरे होईल ना?

एकूणच माध्यमांनी आपल्या छकुलीचे कौतुक करायला कोणाची हरकत नाही. पण त्या छकुलीचे बोबडे बोल म्हणजेच काही अलौकीक बोधामृत असल्याच्या थाटात मांडणी करू नये, इतकीच अपेक्षा आहे. आमची छकुली कधी आपल्या पायावर उभी रहाणार? आमची बाहुली कधी पुढले पाऊल टाकणार? असल्या बोबड्या बोलांनी खुप कौतुक झाले आहे. पण मागल्या दहा वर्षात त्या लाडावलेल्या छकुलीला एक पाऊल टाकण्याची हिंमत झालेली नाही. मागल्या विधानसभा निवडणूकीत याच छकुलीने अमेठी व राजबरेलीत मुक्काम ठोकला होता. पण आईसह भावाच्या त्या बालेकिल्ल्यातल्या अवघ्या दहा जागाही एकहाती जिंकण्याची किमया तिला करून दाखवता आलेली नाही. दहापैकी दोन की तीन जागा कशाबशा कॉग्रेसला जिंकता आल्या आणि त्यापैकी एक तर अमेठीची राणी जिंकून गेली होती. मग सात जागी छकुलीने प्रचार करून काय मोठा पराक्रम गाजवला होता? दहापैकी तीन जागा आपल्याच खानदानी भागात मिळवताना दमछाक झालेल्या छकुलीचे कौतुक कोणी सांगायचे? त्या दहापैकी सात जागा गमावण्य़ाचा पराक्रम कोणी सांगायचा? अमेठी व रायबरेलीच्या मतदाराने पाच वर्षापुर्वीच प्रियंकाला चोख उत्तर दिलेले आहे. त्या जिल्ह्यातला विकास करण्यासाठी दिल्लीत वास्तव्य करणार्‍या कुणा राजकन्येच्या आशीर्वादाची गरज नाही. त्यापेक्षा त्याच जिल्ह्यात व तालुक्यात जन्मलेले स्थानिक भूमीपुत्रही काम करू शकतात. हेच प्रियंकाला मिळालेले चोख उत्तर आहे. पण ते बघायला वा ऐकायला आपल्या छकुलीचे कौतुक विसरून पत्रकारांनी मतमोजणीचे आकडे तपासणे भाग आहे. विवेकबुद्धी शाबुत ठेवून समजून घ्यायला हवे. नसेल तर मग प्रियंकाचे दत्तक‘विधान’ कौतुकाचे होऊन जाते आणि मतमोजणीचा निकाल लागला, मग सगळेच पत्रकार भातुकली संपली, म्हणून आपली छकुली कपाटात ठेवून दुसर्‍या कामात रमून जातात.

– भाऊ तोरसेकर