लाच स्विकारतांना अभियंता एसीबीच्या जाळ्यात

0

चाळीसगाव : शहरातील एका डायग्नोस्टीक सेंन्टरमध्ये असलेले जूने थ्रीफेज विजेचे कनेक्शन बंद केले असल्याने जमा असलेली सुरक्षा ठेव रक्कम व वापरलेल्या युनिटापेक्षा अधिक विज बिल पाठवून कमी करण्यासाठी 9 हजार रूपयाची लाच मागणार्‍या प्रभारी कार्यकारी अभियंत्याला जळगाव लाचलुचपत पथकाच्या पथकाने आज मंगळवारी 27 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास पवार डायग्नोसिस सेंटरमध्ये सहकार्‍यांकडून लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक केली आहे.

डॉ.अनुप परमार यांचे चाळीसगाव शहरातील दुध सागर मार्गावर पवार डायग्नोसिस सेंटर आहे. त्यांना वाजवीपेक्षा जास्त विज बिल येत होते. त्यामुळे तक्रारदार यांनी विज वितरण कंपनीकडे याबाबत तक्रार करून मिटर बदलवून द्यावे याचीही विनंती देखील केली होती. विज वितरण कंपनीचे अभियंता अविनाश यादव त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत असत, आपल्या सहकार्‍याकडून तडजोडीचा निरोप पाठवित होते. त्याचबरोबर अनुप परमार यांचे वडील बी.एन.पवार यांच्या नावाने दुसरे रूग्णालय होते तेथील विज मिटर त्यांनी कायम स्वरूपी डिसकनेक्ट केले आहे. त्याची 40 हजार रूपये अनामत विज वितरण कंपनीकडे थकीत आहे. वेळोवेळी अनामत रकमेची मागणी परमार कुटूंबियांकडून करण्यात आली. मात्र ती देखील देण्यास टाळाटाळ केली जात होती. म्हणून नाईलाजाने डॉ.अनुप परमार यांनी जळगांव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. गेल्या 4 महिन्यापासून जळगांव लाचलुचपत विभागाचे पथक अविनाश यादव यांच्या पाळतीवर होते. तिनवेळा अविनाश यादव यांनी केलेली पैशाची मागणी केल्याची ध्वनीफित तयार झाल्याची माहीती डॉ.अनुप परमार यांनी दिली. आज पैसे घेवून माणूस त्यांच्या कार्यालयात गेला, 9 हजार रूपये आपल्या सहकार्‍याकडून स्विकारतांना रंगेहात पकडून लाचलुचपत विभागाच्या महिला पोलीस अधिकारी कायटे आणि पथकाने अभियंता अविनाश यादव यांना ताब्यात घेतले.