Private Advt

लाच भोवली : जिल्हा उद्योग केंद्राचा प्रकल्प अधिकारी जाळ्यात

जळगाव : पीएमईजीपी या शासनाच्या योजनेंतर्गत कर्ज व सबसिडी योजनेचा लाभ मिळण्याचे प्रकरण अपलोड करून हे प्रकरण बँकेस पाठविण्याच्या मोबदल्यात दहा हजारांची लाच मागणार्‍या जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रकल्प अधिकार्‍यास जळगाव एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी लाच स्वीकारताच कार्यालयातच अटक करण्यात आली. आनंद देविदास विद्यागर (50, रा.अजय कॉलनी,रिंग रोड, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

जिल्हा उद्योग केंद्रातच स्वीकारली लाच
भुसावळ तालुक्यातील 35 वर्षीय तक्रारदार हे सुशिक्षीत बेरोजगार आहेत. त्यांनी पीएमईजीपी या शासनाच्या योजनेंतर्गत कर्ज व सबसीडी योजनेचा लाभ मिळण्याकामी प्रकरण सादर केले होते मात्र हे प्रकरण बँकेस पाठविण्यासह अपलोड करण्याच्या मोबदल्यात आरोपी आनंद विद्यागर यांनी 15 रोजी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली व सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सतीश डी.भामरे, निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, हवालदार अशोक अहिरेे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, नाईक मनोज जोशी, सुनील शिरसाठ, नाईक जनार्दन चौधरी, नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी आदींच्या पथकाने सापळा यशस्वी केला.