Private Advt

लाचखोर विस्तार अधिकार्‍यासह ग्रामसेवकाची पोलीस कोठडीत रवानगी

भुसावळ  : नोटीसीबाबत अनुकूल अहवाल जळगाव जिल्हा परीषदेला पाठवण्याच्या मोबदल्यात दोन हजारांची लाच मागणार्‍या धरणगाव पंचायत समितीतील विस्तार अधिकारी सुरेश शालिग्राम कठाळे, (51, रा.गंगूबाई नगर, पारोळा, जि.जळगाव) व कंडारी बुद्रूक, ता.धरणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कृष्णकांत राजाराम सपकाळे (45, रा. बोरोले नगर, चोपडा) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी लाच स्वीकारताच अटक केली होती. संशयीत आरोपींना मंगळवारी अमळनेर न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची (2 सप्टेंबरपर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

चोपडा शहर पोलिसात दाखल झाला गुन्हा
धरणगाव तालुक्यातील कंडारी बुद्रुक ग्रामपंचायतीतील तक्रारदार शिपाई यांना 2015-2016 या वित्तीय वर्षात जादा वेतन दिले गेल्याने जादा देण्यात आलेली रक्कम परतफेड करण्याबाबत तक्रारदार यांना नोटीस आली व या नोटीसीबाबत अनुकूल अहवालासाठी दोघा आरोपींनी लाच मागितल्यानंतर सापळा रचण्यात आला. संशयीत ग्रामसेवक कृष्णकांत सपकाळे यांनी चोपडा शहरातील हॉटेल मानसीमध्ये सोमवारी दुपारी तीन वाजता लाचेची रक्कम स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली तर लाच प्रकरणात विस्तार अधिकारी सुरेश कठाळे यांचाही सहभाग असल्याने त्यांना धरणगाव पंचायत समितीतून अटक करण्यात आली. आरोपींच्या घराची झडती घेण्यात आली असता त्यात काहीही आढळले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दोघा आरोपींविरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी दोघा आरोपींना अमळनेर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपास जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील व सहकारी करीत आहेत.