Private Advt

लाखाची देशी-विदेशी दारू लांबवली : भामटे जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : जामनेर तालुक्यातील गाडेगाव नेरी येथील एका हॉटेलातून देशी-विदेशी दारु लांवबणार्‍यार दोघा भामट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

एक लाख 10 हजारांची दारू लांबवली
जामनेर तालुक्यातील गाडेगाव नेरी येथील शशिप्रभा हॉटेलमधून चोरट्यांनी मंगळवार, 19 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक लाख 10 हजार 225 रुपये किंमतीची देशी-विदेशी दारू लांबवली होती. याबाबत हॉटेल मॅनेजर शिवाजी दौलत पवार यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय माहितीवरून आरोपी जाळ्यात
या गुन्ह्यातील गुन्हेगार जळगावात असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक किशोर पाटील, चेतन सोनवणे, मुकेश पाटील, सचिन पाटील आदींनी आरोपी दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (22, रा.मच्छीमार्केट सुप्रीम कॉलनी) आणि सागर लक्ष्मण वाधवाणी (20, रा.बाबानगर, सिंधी कॉलनी) या दोघांना अटक केली. आरोपींनी 54 हजार 567 रुपये किंमतीचा मद्यसाठा काढून दिला. या गुन्ह्यात आणखी तीन संशयीत वॉण्टेड असून त्यांचा कसून शोध सुरू आहे. संशयीत आरोपी दिनकर उर्फ पिण्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात विविध ठिकाणी एकूण 16 गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी दोन्ही संशयीत आरोपींना जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.