लाखांच्या पोशिंद्याच्या मरणाचे सुतक

0

लाख मरो पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, असं आपल्याकडे म्हटलं जातं. मात्र, आपल्या कृषिप्रधान मानल्या जाणार्‍या राष्ट्रात कोट्यवधींचा पोशिंदा शेतकरी रोज कर्ज, नापिकी, मालाला भाव न मिळणे आणि सरकारच्या काही धोरणांना कंटाळून मरतोय. तो जगला पाहिजे यासाठी तथाकथित राजकीय पोशिंदे कृतिशील असं काही करण्यापेक्षा केवळ फुकाची सहानुभूती दाखवत आपल्या व्होटबँकचा फुगा फुगवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. प्रत्येक सरकार शेतकर्‍यांसाठी नवीन काहीतरी करू या नावाखाली प्रत्येक पंचवार्षिकला नवीन लॉलीपॉप देत राहतं. शेतकरी मात्र कर्जमाफ होणार आहे या अफवेवरच आशेने जगत राहतो. खरंतर तो आशेवर जगणाराच प्राणी आहे, असं मला माझ्या बापाकडे बघून नेहमी वाटत राहतं. कारण बाप मला लहानपणापासून पुढची सुगी होऊदे तुला हे घेऊ, कांदा निघू दे मग अमक्याचे पैसे देऊन टाकू, यंदा तुरीला भाव मिळाला की सोसायटीचं कर्ज नील करून टाकू असं एक नाही अनेक वाक्य लहानपणापासून बोलताना दिसत आहे. खरंतर प्रत्येक शेतकरी असलेल्या मायबापाच्या तोंडची ही पेटंट वाक्य आहेत. मात्र, यांच्या या भाबड्या आशेवर अनेकदा निसर्ग पाणी फेरतो आणि निसर्गाच्या अस्मानी संकटांना आव्हान देत समजा काही व्यवस्थित केलंच, तर बाजारात नानाविध सुलतानी संकटांना आव्हान देत-देत यांच्या आशेची पार निराशा होऊन जाते. आणि मग वारंवार आपल्या आशेचा भंग झाल्याने तो मरत-मरतच जगणे स्वीकार करतो अन् त्याची सहनशीलता संपते तेव्हा मग तो दोरखंड गळ्याला आवळून किंवा रोगर पिऊन आपल्या मेलेल्या शरीराला कायमचा त्यागतो.

ही मानसिक स्थिती फार भयानक आहे. महिनोमहिने ज्याच्या आशेवर तो जगतो ती आशा एका झटक्यात संपुष्टात येते तेव्हा होणारा वज्रघात फार जिव्हारी लागणारा असतो. असाच वज्रघात जिव्हारी लागल्याने 19 मार्च 1986 रोजी विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात साहेबराव शेषराव करपे या शेतकर्‍याने आपल्या संपूर्ण परिवारासह आत्महत्या केली आणि संपूर्ण देशच हादरला. साहेबराव हे यवतमाळ जिल्ह्यातील चील-गव्हाण या गावचे शेतकरी. उदरनिर्वाहाचे साधन शेती. शेती परवडत नाही. दरवर्षी तोटाच होतो. घेतलेली कर्जे फेडता येत नाही, लाइटचे बिल भरता येत नाही, हात उसने घेतलेल्या पैशांची परतफेड करता येत नाही. म्हणून अस्वस्थ होते. एके दिवशी पत्नी मालती व चार अपत्यांना घेऊन ते पवनार आश्रमात गेले. सविस्तर पत्र लिहिले. रात्री जेवणात विषारी औषध कालवून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्त्या केली. सकाळी त्या एका खोलीतून सहा शव काढावे लागले. साहेबरावांनी लिहून ठेवलेल्या पत्रात त्यांनी शेतकरी म्हणून जगणे कठीण झाले आहे असे नमूद केले होते. ते पत्र समस्त शेतकरी समाजाची दु:खद कैफियत सांगणारे होते.

ही पहिली जाहीर झालेली शेतकर्‍याची आत्महत्त्या होती. अर्थात ही पहिली शेतकरी आत्महत्या नसेलही. कारण शोषक वर्ग हा पूर्वापारपासून शोषित वर्गाचे शोषण करत आलेला आहे. त्यामुळे मरण्याचा कारणाला वेगळं काहीतरी नाव दिलं गेलं असेल. या वर्षी साहेबराव करपे यांच्या या घटनेला 31 वर्षे पूर्ण होत आहेत. लाखाचा पोशिंदा उपाशी आहे, तळमळतो आहे यासाठी महाराष्ट्रात शेतकरी आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ते या दिवशी एक दिवसाचा उपवास करून आंदोलन करणार आहेत. शेतकरी आंदोलक आणि समाजसेवी अमर हबीब आणि अनेक किसानपुत्रांनी यासाठी चांगली भूमिका घेतली आहे. ते म्हणतात, गेल्या 31 वर्षांपासून अखंडपणे शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. हा उन्हाळा संपता संपत नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती समजून उपाययोजना करायला पाहिजे होती. ना त्या सरकारने केली, ना हे सरकार करीत आहे. सरकार दखल घेत नाही तेव्हा नागरिक म्हणून आपली जबाबदारी वाढते. आपण काय करू शकतो?, अशी दुर्दैवी घटना आपल्या घरात घडली तर आपण अन्नाचा घास घेऊ शकू का? नाही हेच उत्तर असेल तर उपवास करण्याचे पहिले तेच आहे. शेतकर्‍याविषयी सहवेदना जिवंत असल्याची ही साक्ष आहे. आपल्या उपोषणाने काय घडेल, हे मी आज काही सांगू शकत नाही पण एवढे मात्र नक्की की, शेतकरी मरत होते तेव्हा मी तटस्थपणे पाहत राहिलो नाही, मला त्याशी जोडून घेण्यासाठी उपवास केला असे सांगताना सार्थकता वाटेल. बिंदू-बिंदूतून सरिता बनते व तीच पुढे सागराला जाऊन मिळते. कदाचित आपला उपवास ही त्या प्रवासाची सुरुवात ठरेल. 19 मार्च रोजी होणारे उपोषण शेतकर्‍यांविषयी सहवेदना व्यक्त करणारे आहे. म्हणजेच ते शेतकरीविरोधी कायद्यांचा निषेध करणारे आहे. या सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी किसानपुत्र वेगवेगळ्या पद्धतीने आवाज उठवत आहेत. आत्मक्लेश आंदोलन तसेच सोशल मीडियावर काळा ठिपका आंदोलन ही प्रभावी ठरत आहेत. त्यांनी आवाहन केले आहे की, 19 मार्च रोजी होणारे उपोषण हे कोणा पक्षाचे नाही किंवा कोणा संघटनेचे नाही. शेतकर्‍याविषयी संवेदना असणार्‍या प्रत्येकाचे आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे. या आपत्तीच्या वेळेस आपण आपले किरकोळ मतभेद बाजूला ठेवणे खरोखर आवश्यक आहे. सारा महाराष्ट्र शेतकर्‍यांच्या बाजूने उभा ठाकला तरच मरणाच्या दारावर उभा राहिलेला शेतकरी मागे फिरेल आणि सरकारलाही शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे भाग पडेल. हे कितपत यशस्वी ठरेल हे माहीत नाही. मात्र, निष्ठुर शासनाला काहीअंशी जाग आली तरी बेहत्तर. शेतकरी कधी सुखी होईल? शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव कधी मिळेल? शेतकरी आत्महत्या कधी थांबतील? असे एक नाही अनेक सवाल या कोटींच्या पोशिंद्यासाठी मनात उठत आहेत. कोटींचा पोशिंदा जर जगला नाही तर फार भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते हे मात्र नक्की.

सारा महाराष्ट्र शेतकर्‍यांच्या बाजूने उभा ठाकला तरच मरणाच्या दारावर उभा राहिलेला शेतकरी मागे फिरेल आणि सरकारलाही शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे भाग पडेल. हे कितपत यशस्वी ठरेल हे माहीत नाही. मात्र, निष्ठुर शासनाला काहीअंशी जाग आली तरी बेहत्तर. शेतकरी कधी सुखी होईल? शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव कधी मिळेल? शेतकरी आत्महत्या कधी थांबतील? असे एक नाही अनेक सवाल ह्या कोटींच्या पोशिंद्यासाठी मनात उठत आहेत. कोटींचा पोशिंदा जर जगला नाही तर फार भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते, हे मात्र नक्की.

निलेश झालटे – 9822721292