Private Advt

लाखांच्या दागिण्यांसाठी मामीचा खून करणार्‍या भाच्यासह मांत्रिक पोलिस कोठडीत

जळगाव : एक लाखांच्या दागिण्यांसाठी नात्याने चुलत मामी असलेल्या माया दिलीप फरसे (51, रा. क्रांती चौक, शिवाजीनगर) यांची शिरागड येथे देव दर्शनासाठी नेण्याचा बहाणा करून विदगाव जवळील नदीच्या काठी असलेल्या जंगलात हत्या करण्यात आल्याचा प्रकार सोमवार, 20 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या प्रकरणी मयत महिलेचा नात्याने भाचा असलेल्या अमोल रतनसिंग दांडगे (27, रा.शिवाजी नगर) व मांत्रिक संतोष रामकृष्ण मुळीक (22, रा.शिवाजीनगर, जळगाव) यांना अटक केली होती. आरोपींना बुधवार, 22 डिसेंबर रोजी जळगाव सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सीसीटीव्हीवरून लागला गुन्ह्याचा शोध
मायाबाई फरसे या पती दिलीप रूपचंद फरसे यांच्यासोबत शहरातील शिवाजी नगरातील क्रांती चौकात वास्तव्यास होत्या. मायाबाई यांचा चुलत भाचा अमोल दांडगे हा नातेवाईक असल्याने त्यांच्या घरी अधूनमधून भेटण्यासाठी येत होता. माया फरसे या महिला शिवाजी नगरातील सारथी पापड कारखान्यात कामास होत्या व बुधवार, 15 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता कारखान्यात कामाला जाते, असे सांगून घराबाहेर पडल्या मात्र घरी न आल्याने पती दिलीप रुपचंस फरसे यांनी शहर पोलिस ठाणे गाठून हरविल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार शहर पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. पोलसांनी पुढील तपासाची चक्रे फिरवून सीसीटीव्हीच्या आधारे चुलत भाचा अमोल दांडगे याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच मामीचा खून केल्याचे त्याने कबुल केले.

महिलेला जंगलात जाळून मारले
मयत माया यांचा मृतदेह जळगाव तालुक्यातील विदगाव शिवारातील जंगलात बुजवण्यात आल्याची कबुली दिल्यांनी पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. जादुटोण्यातून महिलेला दांडगे याने मांत्रिक संतोष रामकृष्ण मुळीक (वय 22, रा. शिवाजी नगर, जळगाव) यांच्या मदतीने जाळण्याचा प्रयत्न करून तिचा खून केल्याचे उघड झाले. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, मंगळवारी पोलिसांनी पुन्हा नदीकाठी जावून चौकशी केली. तपास पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.