लाकड्या हनुमान शिवारात गांजाचा साठा सापडला

0

एलसीबीच्या कारवाईत 2 कोटी 15 लाखाचा मुद्देमाल ताब्यात
शिरपूर: तालुक्यातील लाकड्या हनुमान परिसरातील एका शेतात लपवून ठेवलेला सुमारे 2 कोटी 15 रुपये किमतीच्या गांजा साठ्यावर धुळे स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने 16 रोजी संयुक्त धडक कारवाई केली आहे. ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून करण्यात आली.

तालुक्यातील सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत लाकड्या हनुमान गावाच्या शिवारात मांगीलाल बारकू पावरा यांच्या शेताच्या झोपडीत विक्रीच्या उद्देशाने गांजा साठवून ठेवण्यात आला असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना 16 जून रोजी मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आणि कर्मचारी व एलसीबीच्या पथकाने 16 जून रोजी सायंकाळी छापा टाकला.

लाकड्या हनुमान येथील मांगीलाल बारकू पावरा यांच्या शेताच्या झोपडीत व चार्‍याच्या गंजीत 2 कोटी 14 लाख 72 हजार रुपये किमतीचा 39.04 क्विंटल प्रत्येकी 35 किग्रॅ वजनाच्या 128 गोण्यांमध्ये मानवी मनोव्यापारावर विपरीत परिणाम करणारा उग्र वासाच्या बीया, पाला, काडया मिश्रीत गांजा नावाचा अर्धवट सुकलेला मादक पदार्थ बेकायदेशिररित्या कब्जात बाळगुन त्याची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने साठा केलेला आढळून आला. हा गांजा पोलिसांनी जप्त करीत घटना स्थळावरून 25 हजार रुपये किमतीची मोटारसायकल व 3 हजार रुपये किमतीचा लोखंडी वजन काटा असा 2 कोटी 15 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

याप्रकरणी एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश शामराव बोरसे यांनी सांगवी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन मांगीलाल बारकू पावरा (रा.लाकड्या हनुमान) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील करीत आहेत.