लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बाहेर फिरण्याची मुभा ?

पुणे / मुंबई : ज्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आलेले आहेत अशा नागरिकांना टप्याटप्प्याने बाहेर फिरण्याची मुभा देण्याचा विचार आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही लसीचे डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल करण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे.
राज्यात करोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विशेषत: दुकानांच्या आणि पर्यटनाच्या बाबतीत ही मागणी केली जात आहे. मात्र रुग्णसंख्येत अपेक्षित घट झालेली नसून, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आणि गर्दी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कायम राहतील, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यावर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. “काही जणांच म्हणणं आहे की इथून पुढं १०० ते १२० दिवस खूप म्हत्त्वाचे आहेत. या दिवसांमध्ये नागरिकांनी नियमावलीच तंतोतंत पालन करायला पाहिजे. परंतु, ग्रामीण भागात मास्क वापरत नसल्याचं निदर्शनास आलं आहे. नागरिक विनामास्क असल्याचं चित्र आहे. एक बाधित व्यक्ती अनेकांना बाधित करू शकते त्यामुळे सर्वानी नियम पाळले पाहिजेत, असेही अजित पवार म्हणाले.

केंद्राने लसीकरणाचा वेग वाढवावा

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, तिसरी लाट येऊ शकते पण ते कधी येईल, हे आपल्यावर आहे. जर आपण करोनाचे नियम व्यवस्थित पाळले तर आपल्याला करोनाची तिसरी लाट थोपवता येऊ शकेल. तसेच यावर लसीकरण सुद्धा रामबाण उपाय असल्याचे टोपे म्हणाले. महिना दोन महिन्यात राज्याचे लसीकरण १०० टक्के पुर्ण करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. पण त्या गतीनं लस उपलब्ध व्हायला हवी. केंद्राने लसीकरणाला वेग देण्यासाठी मदत करायला हवी. जर ६० ते ७० टक्के लसीकरण झाले. तर सामुहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल, असेही राजेश टोपे म्हणाले.