लग्न सभागृहाची भिंत कोसळून 25 ठार, 60 जखमी

0

जयपूर । वादळ आणि पावसामुळे लग्न सभागृहाची भिंत कोसळल्याने 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात घडली आहे.

अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अपघातात सुमारे 60 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये 8 महिला आणि 5 लहान मुलांचाही समावेश आहे. एका लग्न घरात ही दुर्घटना घडल्याने गावातील आनंदाची जागा आता दु:खाने घेतली आहे. यानंतर संपूर्ण गावात शोकाकूल वातावरण आहे.

मोठा आवाज झाला अन् हाहाकार उडाला…
प्रत्यक्षदर्शी लक्ष्मण प्रसाद यांनी सांगितले की, लग्नाला जवळपास 800 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. अचानक वादळी वार्‍यासह पाऊस आला आणि मोठा आवाज झाला. यावेळी लोक जेवण करत होते. तितक्यात मंगल कार्यालयाची भिंत आणि टिनशेड त्यांच्या अंगावर कोसळले. त्याखाली लहान मुलांसह शेकडो महिला-पुरुष दबले गेले. वीज खंडित झाल्याने सर्वत्र हाहाकार उडाला होता.

मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी दु:ख व्यक्त केले
दुर्घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यानंतर ढिगार्‍याखाली अडकलेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी घडलेल्या दुर्घटनेविषयी दु:ख व्यक्त केले आहे. जोरदार वादळामुळे लग्न सोहळा सुरू असलेल्या हॉलची भिंत कोसळल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

मृतांमध्ये लहान मुले
दुर्घटनेनंतर जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘एका लग्न सोहळ्यादरम्यान भिंत कोसळल्याने 25 जणांचा ढिगार्‍याखाली सापडल्याने मृत्यू झाला. या दुर्घटनेत 60 जणांना दुखापत झाली आहे. मृतांमध्ये 11 पुरुष, 8 महिला आणि 4 लहान मुलांचा समावेश आहे. मृतांमध्ये आणि जखमींमध्ये जयपूरहून आलेल्या वर्‍हाडींचादेखील समावेश आहे,’ अशी माहिती पोलीस अधीक्षक अनिल कुमार यांनी दिली. आरबीएम हॉस्पिटलमध्ये बाबुलाल, राजकुमारी, जवाहर सिंह, सचिन ओझा, दीपक, हरस्वरूप, उदयसिंह, रामकुमार, जोगेंद्रसिंह, सुमन, महेंद्रसिंह, जुगल सिंह यांच्यावर उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना तारा महेंद्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यात विक्रम सिंह आणि अजय सिंह यांची प्रकृती चिंताजनक आहे.