लग्नासाठी योग्य वय किती ?

0

महिलांना आपल्या जीवनात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यापैकी एक म्हणजे कमी वयात होणारा विवाह. नुकतेच केंद्र सरकारने मुलींचे लग्नाचे वय 18 वर्षा वरून 21 करण्याबाबत एक समिती नेमली आहे. या निर्णयामुळे माता मृत्यू प्रमाण, वैवाहिक अत्याचार, कुपोषण कमी होण्याबरोबरच मुलींना त्यांच्या शिक्षणाचा विस्तार करण्याची संधी मिळणार आहे. तथापि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते आणि हा निर्णय विवाहापुरताच मर्यादित असेल का ? आदी प्रश्न यानिमित्ताने उभे राहतात. नुकतेच केंद्र सरकारने मुलींच्या लग्ना साठीचे वय बदलण्याचे संकेत दिले असून सध्याचे मुलींचे लग्नासाठीचे असलेले 18 वर्षे वय बदलून ते 21 करण्यासंबंधीचा अहवाल तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही अर्थसंकल्प सादर करताना मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 वर्षे करण्याचे संकेत दिले होते. त्यावेळी महिला हक्कांसाठी काम करणार्‍या अभ्यासकांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी काही प्रश्नही उपस्थित केले होते. मुलींचे लग्नाचे वय वाढविण्यासंदर्भात एखादी समिती स्थापन करण्यात येणार आहे का? समितीमध्ये कोणकोणत्या क्षेत्रातील सभासद असतील किंवा समितीचा कार्यकाल याबाबत स्पष्टता नसल्याचे तज्ञांचे म्हणणे होते. तसेच सरकारने नवा निर्णय घेण्यापूर्वी गेल्या तीन दशकांतील घडामोडींचा आढावा घेण्याबरोबरच लग्नाचे वय वाढविण्यापेक्षा मुलींना सक्षम करण्याचे, मुलींसाठी सुरक्षित वातावरण सरकारने निर्माण करावे, असेही तज्ञांनी सुचविले होते. बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार मुलींच्या लग्नाचे वय 18 वर्षे तर पुरुषांच्या लग्नाचे वय 21 वर्षे आहे. हा कायदा अस्तित्वात येऊन 13 वर्षे उलटली, तरी जगातील सर्वाधिक बालविवाह भारतातच होत असून, महाराष्ट्राचा सर्वाधिक बाल विवाह होणार्‍या पहिल्या पाच राज्यांमध्ये क्रमांक लागतो. म्हणून मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली वाढती असुरक्षितता सर्वप्रथम दूर करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे वाटते.

कुणी कधी लग्न करायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तथापि, घरच्या बुजुर्ग मंडळींची घाई आणि भावी वधू-वरांची नकारात्मक चालढकल, असे चित्र नेहमीच पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर तीन वर्षापूर्वी झालेल्या एका संशोधनातून लग्नासाठी योग्य वय कोणते? या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. संशोधनातून 29 वे वर्ष सर्व बाजूंनी योग्य असलेचे समोर आले होते. हल्ली 24-25 व्या वर्षी मुला-मुलींना नोकर्‍या मिळून त्यांच्या करिअरची सुरुवात होते. सुरुवातीची पाच वर्षे नोकरीवर पूर्ण लक्ष देऊन 29 व्या वर्षापर्यंत कामावर पकड बसते. आता ते लहान-मोठं घर बुक करू शकतात. या वयात प्राथमिकता कोणत्या गोष्टींना द्यावी हे कळते. स्वतःला समजण्याचे भान येते आणि लग्नासाठीची शारीरिक आणि मानसिक तयारीही झालेली असते. ऑक्टोबर 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मुलांचे लग्नासाठीचे वय 21 वर्षा वरून 18 वर्षे करण्याबाबत सादर केलेला अशोक पांडे या वकिलाचा अर्ज फेटाळताना त्याला 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता. देशात मतदानाचा अधिकार 18 व्या वर्षी मिळतो, लष्करात भरती होण्यासाठीची किमान वयोमर्यादा देखील 18 वर्षे असल्याने लग्नाची वयोमर्यादा सुद्धा 21 वर्षा वरून 18 वर्षे करावी, असे न्यायालयास सादर केलेल्या अर्जात म्हटले होते. तथापि, न्यायालयाने अर्जदाराला चांगलेच सुनावून 50 वर्षीय अर्जदाराने लग्नाचे वय 18 वर्षे करण्याची मागणी निरर्थक असून, ज्यावेळी एखादा 18 वर्षाचा मुलगा याबाबत न्यायालयात येईल तेव्हा पाहू असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या या निर्णयाचे काही फायदे होऊ शकतात. यामुळे माता मृत्यू प्रमाण कमी होणे, वैवाहिक अत्याचार प्रकरणे कमी होणे, कुपोषण स्तर कमी होणे तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे मुलींना त्यांच्या शिक्षणाचा विस्तार करता येऊ शकेल. तथापि, हा निर्णय प्रत्यक्षात किती स्वीकारला जातो ? हे एक आव्हान असून दुसरे म्हणजे, हा निर्णय विवाहापुरताच मर्यादित असेल तर ठीक आहे. कारण, सध्या देशामध्ये अठरा वर्षे पूर्ण करणार्‍यांना सरकार निवडण्याचा आणि वाहन परवाना आदी कल्याणकारी योजनांचा अधिकार मिळत आहे.

शहरांमध्ये मात्र गेल्या काही वर्षांपासून मुलींच्या लग्नाच्या वयामध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसत असून विशेषतः उच्चशिक्षण घेणार्‍या मुलींचे लग्नाचे वय 25 वर्षांच्या पुढे गेले असून, 27 ते 30 वर्षे या वयामध्ये लग्न करणार्‍या मुलींचे प्रमाण वाढत आहे. करिअरमुळे या मुली लग्नाचा निर्णय पुढे ढकलत असल्या तरी ग्रामीण भागातील चित्र वेगळे असून काहीसे गंभीर आहे. एका सर्वेक्षणानुसार आजही सात विवाहांमागे एक बाल विवाह होत आहे. या पार्श्वभूमीवर मुलींचे लग्नाचे वय कायद्याने वाढविल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतील, असे वाटते. मुलींना शिकण्यासाठी आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्यास पुरेसा वेळही मिळू शकेल. मात्र या निर्णयाची माहिती समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे.

– विजय कोष्टी, कवठे महांकाळ (जि. सांगली)