लग्नतुरानाम न भयं न लज्जा…

2

तळहातावरच्या फोडाप्रमाणे पित्याने मुलगी वाढवावी, जपावी, इभ्रत जाऊ नये म्हणून हुंडाही द्यावा वरून पलंग, गादी पण द्यावी हा वर मुलांच्या नपुंसकतेच्या कळस म्हणावा लागेल. ज्याला सासर्‍याकडून पलंग अन् गादीसुद्धा हवी असेल अशा मुलांनी तर पुरुषार्थाच्या गप्पाच मारू नये. जोवर नोकरीवाल्या मुली बेरोजगार मुलाला प्राधान्य देणार नाहीत तोवर विवाह बाजारातली ही तेजी आणि आर्थिक असमतोल दूर होणार नाही, ज्या दिवशी हे भान मुलींमध्ये येईल त्या दिवसाची आपण प्रतीक्षा करू या!

सध्या विवाहाच्या बोहल्यावर उभे असणार्‍या आणि इच्छुक असणार्‍या किती तरुणतरुणींनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास वाचला असेल माहीत नाही. वि. का. राजवाडे यांचे हे पुस्तक आहे. प्रख्यात तत्त्ववेत्ता बर्टोड रसेल याचे ’मॉरल अँड मॅरेजेस मार्गारेट मीड यांचे मेल अँड फिमेल यांसारख्या असंख्य पुस्तकात आपल्या विवाह संस्थेचा इतिहास येतो. तो मोठा मनोरंजक आणि दुसर्‍या बाजूला आपल्या संस्कारांच्या उतरंडीला जोरदार झटके देणारासुद्धा आहे. आपण विवाह हा संस्कार मानतो, दोन परिवाराच्या समग्र आदानप्रदानाचे माध्यमही त्याला आपण मानत आलेले आहोत. जगातल्या अनेक धर्म आणि संस्कृतीमध्ये मात्र विवाह आजही एक करार मानला जातो, खरं म्हणजे आपल्याकडेही तो करारच असतो. परंतु, संस्कार नावाच्या आवरणातून तो आपल्याला हवा असतो हे वास्तव आहे. विवाहाला प्राचीन ग्रंथ, संस्कृती, वेद, पुराणे, स्मृती यांच्यात काय महत्त्व दिले आहे याची चर्चा आजच्या काळात करणे व्यर्थ आहे.

उपवर मुलींच्या विवाहाचा प्रश्‍न पित्याच्या छातीवर सध्या मनामनाचे ओझे टाकणारा असला, तरी त्याची खरी गरज पुरुषाला असते हे वास्तव कुणी नाकारू शकत नाही फक्त सत्य आपण स्वीकारत नसतो. मार्गारेट मीड 1949 सालात लिहिलेल्या आपल्या मेल अँड फिमेल या पुस्तकात असे म्हणते की विवाह हा नेहमीच पुरुषाचा प्रश्‍न आहे, तो स्त्रीचा कधीच नव्हता आणि आजही नाही. यासंदर्भात तिने हिंसक, आक्रमक आणि टोळी करून राहणार्‍या पुरुषांचे अगदी आदिम संदर्भ दिले आहेत. या वाक्याला आताच्या काळाचे माप लावून बघायचे असेल तर मला वाटते मार्गारेट त्रिकालाबाधित सत्य लिहून गेली आहे. टोळीत राहणारा बकाल, ओबडधोबड आणि भीतीप्रद दिसणारा पुरुष वरून आमूलाग्र बदलला असला, तरी त्याने अंगभूत शस्त्रे अदृश्य केल्याचे दिसते. तो आजही हिंसक, क्रूर, आक्रमक, स्वार्थी आणि विकृत आहे. त्याचा पुरुषी अहंकार काळाच्या ओघात कमी किंवा लुप्त होण्याऐवजी वाढला आहे.

आपल्या देशात 60च्या दशकात हुंडाविरोधी कायदा झाला. मात्र, या नावाचा कुठलातरी कायदा होता हेच आता आठवत नाही एवढी स्वार्थाची इतर अवयव आपण वाढवून बसलो आहोत. भरमसाट हुंडा आणि खर्चीक समारंभ ही प्रतिष्ठा ज्यांना झेपत नाही त्यांचे खरे प्रश्‍न तयार झाले आहेत. सरकारी नोकरी करणारा मुलगा विवाहाच्या बाजारातला सध्या सुपरस्टार झाला आहे. 2 लाखांपासून तर कोटीपर्यंत बाजारात अशा हिजड्यांची बोली डोळ्यादेखत लागताना बघावे लागत आहे, त्याला प्रतिष्ठाही मिळत आहे. कामातुरानाम न भयं न लज्जा असे वचन आपण आजवर ऐकत आलो आहोत. या पुढे मात्र लग्नातुरानाम न भयं न लज्जा हे घडण्याचे दिवस कधीच आले आहेत. चाळीस किलो वजनाचा मुलगाही 5 लाख रुपये हुंडा मागायला आता मागेपुढे पाहत नाही याचा अनुभव आपण घेत आहोत. आईबापांनी मुलाला शिकवले, नोकरीवर लावले हाच जणू वधूपित्यावर उपकार केले, या भावनेतून बोली लागत आहे.

बर्टोड रसेल याबाबत मोठे खतरनाक वाक्य वापरतो, तो म्हणतो वेश्या आणि विवाहित स्त्री यात मी फरक करीत नाही, वेश्या एका रात्रीसाठी शरीर गहाण टाकते, तर विवाहित स्त्री आयुष्यभराच्या सुरक्षेसाठी. मला माहीत आहे या वाक्यावर मोठा वाद होऊ शकतो, पण वादाच्या प्रचंड घुसळणीनंतर हातात जे नवनीत लागते ते रसेलच्या बाजूने झुकणारे असते हे लक्षात घ्यायला हवे. मुलींना ऊठसुट नोकरीवाला मुलगा हवा असतो, बेरोजगार किंवा शेती, व्यवसाय करणार्‍या मुलांचा नाईलाज म्हणून विचार केला जातो यातच रसेल विजयी झालेला असतो. एखाद्या मुलाची आर्थिक स्थिती बेताची असेल आणि त्यांचा संसार उभा करण्यासाठी वधूपित्याने काही मदत केली, तर ते समजण्यासारखे आहे. परंतु, सगळी सुखे पायाशी लोळण घेत असतानासुद्धा हुंड्याची अपेक्षा ठेवणे हा अविचार, लालच आणि शोषण आहे. या प्रक्रियेत आईवडिलांचा आडोसा घेऊन व्यवहार करणारे अतिशय घातक असतात. हुंडा मला अजिबात आवडत नाही, पण काय करू आई अडून बसली आहे अन् तिला मी दुखवू शकत नाही, अशा शिखंडी मुलांपासून सावध राहायला हवे.

दुर्दैवाने या हुंड्याच्या बाजारात आता शिक्षित आणि उच्चशिक्षित एवढेच ग्राहक उरले आहेत, ज्यांना आपण अडाणी म्हणतो त्यांनी कधीच सामूहिक विवाहांचे पर्याय स्वीकारले आहेत, आमची मात्र तिथे पोजिशन डाऊन होते. डॉक्टर, इंजिनीअर, प्राध्यापक, वकील, अभियंता यांनी तर कमरेचे सोडून कधीच डोक्याला गुंडाळले आहे. जगाला अकलेचे डोस पाजत फिरणारे शिक्षक, प्राध्यापक, वक्ते आणि राजकीय कार्यकर्ते मोठ्या अभिमानाने स्वतःच्या विकण्याचाही इव्हेंट करतात त्यावेळी मन शरमेने खाली जाते. तळहातावरच्या फोडाप्रमाणे पित्याने मुलगी वाढवावी, जपावी, इभ्रत जाऊ नये म्हणून हुंडाही द्यावा वरून पलंग, गादी पण द्यावी, हा वर मुलांच्या नपुंसकतेचा कळस म्हणावा लागेल. ज्याला सासर्‍याकडून पलंग अन् गादीसुद्धा हवी असेल अशा मुलांनी तर पुरुषार्थाच्या गप्पाच मारू नये. जोवर नोकरीवाल्या मुली बेरोजगार मुलाला प्राधान्य देणार नाहीत तोवर विवाह बाजारातली ही तेजी आणि आर्थिक असमतोल दूर होणार नाही, ज्या दिवशी हे भान मुलींमध्ये येईल त्या दिवसाची आपण प्रतीक्षा करू या!

– पुरुषोत्तम आवारे पाटील
9892162248