रोहित पवारांनी धुडकावला शरद पवारांचा सल्ला

मुंबई : राजकीय नेत्यांकडून होणारे पूरग्रस्त भागातील दौरे टाळण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं होतं. परंतु रोहित पवार यांनीदेखील पूरग्रस्त भागांच्या दौऱ्याचा निर्णय घेतला. यावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी ‘आजोबांच्या सल्ल्याला नातवाचाच मान नाही…’ म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं होतं. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी मानवहानीही झाली होती. त्यानंतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्या भागांचे दौरे करण्यास सुरूवात केली होती. परंतु राजकीय नेत्यांकडून होणारे पूरग्रस्त भागातील दौरे टाळण्याचं आवाहन शरद पवार यांनी केलं होतं.
परंतु रोहित पवार चिपळूण दौऱ्यावर निघाले आहेत. यावरून सदाभाऊ खोत यांनी ट्विटरच्या माध्यमातून रोहित पवारांना टोला लगावला आहे. “आजोबांनी सांगितलं राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे करून नयेत. आजोबांच्या सल्ल्याला नातवाचाच मान नाही आणि जामखेडचे आमदार चिपळूणच्या दौऱ्यावर. आजोबांचा हा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीसांकरिता होता का?,” असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

“माझा पूर्वीचा अनुभव, विशेषत: लातूरच्या वेळचा अनुभव आहे. अशा घटनांनंतर अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जातात. आता शासकीय यंत्रणा पूनर्वसनाच्या कामात व्यस्त असते. त्यांचं लक्ष विचलित होईल, त्यामुळे असे दौरे टाळावेत. मी लातूरला असताना, आम्ही सगळे जण कामात होतो, पंतप्रधान येत होते. त्यामुळे मी पंतप्रधानांना सांगितलं दहा दिवस येऊ नका. तुम्ही आला तर यंत्रणा तिकडे लावावी लागेल. मला आनंद आहे, माझी विनंती मान्य केली आणि ते दहा दिवसांनंतर आले. त्यामुळे कोणत्याही नेत्यांनी प्रसंगावधान राखावं, मी सुद्धा आता दौऱ्यावर जात नाही. त्याचं कारण बाकीची यंत्रण फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही, असं पवार म्हणाले.