Private Advt

रोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी

0

सोशल डिस्टंन्सिंगचा उडाला फज्जा ; पवारांच्या दौर्‍यात बेशिस्तीचे दर्शन

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा दौरा आज बेशिस्तीचे दर्शन घडवणारा ठरला. सायंकाळी 6.30 वा. रोहित पवारांचे आगमन कार्यालयात होताच तरूण कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. या गर्दीत जिल्हा नेत्यांना अक्षरश: लोटालोटी झाल्याचे चित्र दिसून आले. कोरोनाचे संकट कायम असतांना कार्यालयात झालेल्या अलोट गर्दीमुळे सोशल डिस्टंन्सींगचा फज्जा उडाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे आज प्रथमच जिल्हा दौर्‍यावर आले होते. दुपारी 3 वा. त्यांचे जळगाव शहरात आगमन होणार होते. मात्र पाचोरा, शेंदुर्णी, पहूर, नेरी येथील कार्यक्रमांनाच उशिर झाल्याने त्यांचा नियोजीत जळगाव दौरा तब्बल साडेतीन तास लांबला. दुपारपासूनच कार्यकर्ते आणि पदाधिकारी जिल्हा कार्यालयात येऊन रोहित पवारांच्या आगमनाची माहिती घेत होते. अखेर सायंकाळी 6.30 वा. आमदार रोहित पवार यांचे राष्ट्रवादी कार्यालयात आगमन झाले.

ढोल-ताशांचा गजर अन् फटाक्यांची आतषबाजी
आमदार रोहित पवार यांचे पक्ष कार्यालयाजवळ आगमन होताच ढोल-ताशांचा जोरदार गजर करण्यात आला. तसेच फटाक्यांचीही प्रचंड आतषबाजी करण्यात आली. रोहित पवार हे प्रथमच जळगाव दौर्‍यावर आल्याने तरूण कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी अलोट गर्दी केली होती. प्रवेशद्वाराजवळ गाडी थांबण्या आधीच दरवाजाजवळ कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने पवारांना गाडीतून उतरणेही अवघड झाले होते.

कार्यालयात उडाला गोंधळ
पवारांचा दौरा म्हटला की तिथे शिस्तच आली म्हणून समजा. मग ते खा. शरद पवार असो, उपमुख्यमंत्री अजित पवार असो बेशिस्त पवार कधीही खपवून घेत नाहीत. मात्र त्याला अपवाद ठरले ते आमदार रोहित पवार. आमदार रोहित पवार यांच्या दौर्‍यानिमीत्त जिल्ह्याचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर, गफ्फार मलीक, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे यांच्यासह पदाधिकारी कार्यालयात थांबून होते. आमदार पवार यांचे कार्यालयात आगमन होताच त्यांचे सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्ते यांच्यात प्रचंड लोटालोटी झाली. यात गुलाबराव देवकर, गफ्फार मलीक यांच्यासह पदाधिकार्‍यांनाही कार्यकर्त्यांनी लोटले. स्वागतासाठी गोंधळ होत असल्याचे लक्षात येताच रोहित पवारांनी माइकचा ताबा घेतला आणि थेट भाषणाला
सुरवात केली.

भाषण आटोपल्यानंतर पुन्हा लोटालोटी
आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुन्हा लोटालोटी सुरू केली. त्यामुळे बहुतांश वरीष्ठ पदाधिकारी व नेत्यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला.