रोहयोद्वारे 50 हजार मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विभाग प्रमुखांनी काम करावे

0

नंदुरबार: कोविड-19 चे संकट आणखी काही काळ असण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांचे आरोग्य आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 50 हजार मजूरांना रोजगार उपलब्ध करून देणे अशा दोन्ही पातळ्यांवर विभाग प्रमुखांनी काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा, वसुमना पंत, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, कैलास कडलग, महेश सुधळकर आदी उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, कोरोना दीर्घकाळ राहील यादृष्टीने नियोजन करावे. शासकीय रुग्णालयाची यंत्रणा अधिक परिपूर्ण करण्यावर भर द्यावा. मान्सूनपूर्व रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्तीची कामे करावी. एखाद्या भागात रुग्ण आढळल्यास त्या भागातील व्यवहार तातडीने बंद करावेत. ग्रामीण भागातील व्यवहार सुरळीतपणे सुरू राहतील याची दक्षता घ्यावी.लॉकडाऊनच्या काळात अनेकांना रोजगार नसल्याने मनरेगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे व्यापक नियोजन करण्यात यावे. प्रत्येक गावाने योजनेअंतर्गत एक मोठे काम घ्यावे. शिक्षकांच्या माध्यमातून ग्रामस्थांना योजनेचे महत्व पटवून द्यावे. अक्कलकुवा आणि अक्राणी भागात वन व कृषी विभागाने विशेष पुढाकार घ्यावा. जिल्ह्यात किमान 100 कोटीपेक्षा अधिकची कामे होऊन 50 हजार मजूरांना रोजगार मिळेल, असे प्रयत्न सर्व यंत्रणांनी मिळून करावे. मजूरी अदा करण्याच्या कामात उशिर करू नये, असे निर्देश त्यांनी दिले.

Copy