रोड रोमिओंचे पोलिसांना खुले आव्हान

0

जळगाव । शहरातील मध्यवर्तीत व बेंडाळे महाविद्यालयासमोरील असणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या परिसरात साईबाबा मंदिरा जवळ चक्क रोडरोमिओचा बर्थडे पार्टी सेलिब्रेशन करण्यात आले. महाविद्यालयीन भागात असणारे क्रीडा संकुलाच्या आवारात अनेक मुलींना छेडखाणी करण्याच्या घटना घडल्या आहेत. रोड रोमिओची हिंमत वाढत असून याला अटकाव करण्याची गरज आहे. पुन्हा एकदा आता रोडरोमिओच्या समस्येचा विषय ऐरणीवर आला आहे. यासाठी पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून तत्काळ रोडरोमिओवर कार्यवाही करावी अशी मागणी परीसरातून होत आहे.

महाविद्यालयीन तरुणींना पाहून फोडले फटाके

शिवाजी महाराज क्रीडा संकुला समोरच महिला महाविद्यालय आहे. त्याच आवारात गजानन पाटील नामक रोड रोमिओचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी रोड रोमिओ समर्थकांची चांगलीच गर्दी झाली होती. महाविद्यालयीन तरुणी रस्त्यावरून जात असतांना फटाके देखील फोडण्यात आले. यावेळी क्रीडा संकुलाच्या परिसरातील संपूर्ण परिसर फटाक्याच्या आवाजाने दणाणून गेला होता. स्पोर्ट बाईकवर केक ठेऊन गजानन पाटील या रोड रोमिओने केक कापला. आपल्या सोबतच्या रोमिओ मित्रांना सोबत घेत एकमेकांना केक ने भरण्यास सुरुवात केली. महाविद्यालयीन तरुणींना शायनिंग मारण्यासाठी बर्थडे घरी न कापता कॉलेजसमोर कापल्याचे अनेक उपस्थितांनी बोलून दाखविले आहे. यावेळी रस्त्यावर चालणार्‍या सगळ्याचे लक्ष रोड रोमिओच्या चाललेल्या उच्छादाकडे होते.

निर्भया पथक आहे कुठे?

महिलाच्या व महाविद्यालयीन भागातील तरुणीच्या सुरक्षेच्या दृष्टीने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी दक्षता घेऊन निर्भया नावाचे विशेष पथक सुरु केले होते. या मध्ये महिला अधिकार्‍या ची देखील नियुक्ती तसेच एक वाहन देण्यात आले होते. निर्भया पथक सुरु झाल्या नंतर बर्‍याच ठिकाणी कार्यवाही झाली. मात्र आता सुरु असलेल्या रोड रोमिओच्या उच्छाद थांबविण्यासाठी जिल्हा पोलीस दलाचे निर्भया पथक गेले तरी कुठे? अशी चर्चा शहरात आहे. महिला छेडछानी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होतात. मात्र वेळे वर निर्भया पथक नसल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.

व्यापारी चिंताग्रस्त अन् रोड रोमिओ मस्त

संकुलातील व्यापार्‍यांना रोड रोमिओची डोकेदुखी ठरली आहे. कायम होत असलेल्या वादामुळे ग्राहक येत नसल्याचे वस्तू विक्रीवरही परिणाम झाला आहे. शहरातील अनेक वृत्तपत्रांनी देखील याबाबत आवाज उठविला असता तात्पुरता कार्यवाही करण्यात येते. मात्र यासाठी कायमच्या उपाय योजना कराव्यात अशी मागणी क्रीडा संकुलातील व्यापार्‍यांनी केली आहे. रोड रोमिओ नेहमी जोरात हॉर्न वाजवून वाहने चालवीत असलेल्या मुलीची छेड करीत असतात. क्रीडा संकुलाच्या भागात बसून टवाळखोरीच्या प्रकारात आता पुन्हा वाढ झाली. असून कार्यवाहीचे सत्र आता हातात घेण्याची गरज आहे.

तरुणीला जाळ्यात फसविण्याचे प्रयत्न

बेडाळे महाविद्यालय, नंदिनीबाई मुलीचे विद्यालय, मराठा विंद्या प्रसारक मंडळाचे नूतन मराठा कॉलेज, आर.आर.विद्यालय, ला.ना. विद्यालय, सु.ग.देवकर विद्यालय व अनेक क्लासेस वर्ग शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या परिसरात आहे. यामुळे महाविद्यालयीन तरूण, तरुणीची संख्या या ठिकाणी अधिक असते. या महाविद्यालयीन तरुणींना आपल्या जाळ्यात फसवण्यासाठी रोड रोमिओ तरुणीच्या एकट्यापणाचा फायदा घेऊन रस्त्यात अडवितात व तिला आपल्या जाळ्यात फसविण्याचा प्रयत्न करीत असतात. चुकीच्या कामात लक्ष देत असताना रोड रोमिओ गुन्हेगारीकडे वळत असतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाला कठोर कार्यवाही करण्याची गरज आहे.