रोकड व्यवहारांवर भरमसाठ शुल्क

0

नवी दिल्ली : काही खासगी बँकांकडून बचत खात्यातील रोकड व्यवहारांवर भरमसाठ शुल्क आकारण्यात येणार आहे. रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली हे शुल्क आकारण्यात येणार आहे. काही बँकांनी 1 मार्चपासून या नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय आणि अ‍ॅक्सिस बँकेने या शुल्कवाढीचा नवा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बँकांमधील रोकड व्यवहारांसह एटीएममधून होणार्‍या व्यवहारांवरही मर्यादा आणण्याबाबत पुन्हा रिझर्व्ह बँकेकडून नियम लागू करण्यात येणार आहेत.

चारच व्यवहार मोफत
1 मार्चपासून एचडीएफसी बँकेच्या बचत खातेधारकांना दर महिन्याला बँक शाखेत जाऊन चार वेळा पैसे जमा अथवा काढल्यानंतर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, त्यानंतरच्या रोकड व्यवहारांवर शुल्क भरावे लागणार आहे. चौथ्या व्यवहारानंतर प्रत्येक व्यवहारावर तब्बल 150 रुपये शुल्क आकारले जाईल.

किमान 150 रुपये शुल्क
एचडीएफसीप्रमाणेच आयसीआयसीआय बँकेतही महिनाभरात चार वेळा रोकड व्यवहार झाल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, त्याहून अधिक व्यवहार झाल्यास प्रत्येक व्यवहाराला कमीत-कमी 150 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. एक महिनाभरात एक लाख रुपयांपर्यंतची मर्यादा ठेवली जाऊ शकते. तर अ‍ॅक्सिस बँकेतही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. होम ब्रांचमध्ये एक लाखापर्यंतची रक्कम जमा अथवा काढली जाऊ शकते. त्याहून अधिक रक्कम जमा अथवा काढल्यास प्रति हजार रुपयांस पाच रुपये शुल्क किंवा किमान 150 रुपये शुल्क भरावा लागणार आहे.

दरहजारी पाच रुपये शुल्क
एका महिन्यात ग्राहकाला बचत अथवा वेतन खात्यातून होम ब्रांचमधून दररोज दोन लाखांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. त्याहून अधिक रक्कम काढायची असल्यास प्रत्येकी हजार रुपयांना 5 रुपये किंवा किमान शुल्काच्या रुपात 150 रुपये आकारले जाणार आहेत. यापूर्वी हीच मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत होती. तसेच बँकेच्या इतर शाखांमधून दररोज 25000 रुपयांपर्यंतची रक्कम काढल्यास कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. पण त्याहून अधिक रक्कम काढल्यास दरहजारी पाच रुपये किंवा किमान 150 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.