रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळल्याचे ‘ते’ वृत्त चुकीचे; इराणचे स्पष्टीकरण

0

चाबहार: मागील आठवड्यात इराणने भारतला चाबहार रेल्वे प्रकल्पातून वगळल्याचे वृत्त माध्यमातून प्रसारित झाले होते. चीनला इराण जवळ करीत असून भारताला दूर सारत असल्याचे देखील म्हटले जात होते. मात्र ते वृत्त चुकीचे होते असे सांगत इराणने भारताला चाबहार रेल्वे प्रकल्पातून वगळलेले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. इराणकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे असून, त्यात भारत चाबहार जहांदान रेल्वे प्रकल्पाचा भाग असल्याचे सांगितले आहे. चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळण्यात आल्याच्या मीडियाच्या वृत्ताचे इराणने खंडन केले. इराणच्या परिवहन आणि रेल्वे विभागाचे उपमंत्री सईद रसौली यांनी या वृत्तांचा निषेध करत या अहवालामागे कारस्थान असल्याचेही आरोप केले आहे. हा रेल्वे प्रकल्प चाबहार बंदर ते जहांदानदरम्यान बांधला जाणार आहे.

गेल्या आठवड्यात इराणचे परिवहन व नगरविकास मंत्री मोहम्मद इस्लामी यांनी 628 किलोमीटर लांबीच्या रेल्वे ट्रॅकच्या कामाचे उद्घाटन केले. हा रेल्वे मार्ग अफगाणिस्तानच्या झारंज सीमेपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

2016मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इराण दौर्‍यादरम्यान चाबहार करारावर स्वाक्षरी झाली होती. संपूर्ण प्रकल्पात सुमारे 1.6 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार होती. इरकॉनचे अभियंतेदेखील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इराण येथे गेले, परंतु अमेरिकेच्या निर्बंधामुळे भारताने रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू केलेले नव्हते. अमेरिकेने चाबहार बंदरासाठी सवलती दिल्या आहेत, पण उपकरण आणि पुरवठादार अद्यापही उपलब्ध नाहीत.

Copy