इतिहासात ‘रेल्वेच्या वाढदिवसालाच’ देशभरात ‘प्रवासी रेल्वे सेवा’ ठप्प

0

भुसावळ (गणेश वाघ) : भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य घटक असलेल्या रेल्वेने गुरुवार, 16 एप्रिल 2020 रोजी 167 व्या वर्षात पर्दापण केले. एरव्ही रेल्वेच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील रेल्वेच्या विविध विभागांसह प्रवासी संघटनांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते मात्र यंदा पहिल्यांदाच कोरोनाच्या संकटामुळे प्रवासी रेल्वे सेवा बंद असल्याने सार्‍यांचाच हिरमोड झाला आहे. भुसावळ विभागातून दिवसभरात सरासरी 180 पॅसेंजरसह मेल व एक्स्प्रेस गाड्या धावतात व या माध्यमातून हजारो प्रवासी इच्छीत स्थळी प्रवास करतात मात्र कोरोनामुळे सर्वच गाड्यांची प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने 3 मे पर्यंत भुसावळ विभागाला सुमारे 45 कोटींचा रुपयांचा फटका बसणार असल्याचा अंदाज आहे.

इतिहासात प्रथमच साजरा झाला नाही वाढदिवस
देशात पहिली ट्रेन 16 एप्रिल 1853 रोजी त्यावेळचे बोरीबंदर आताचे सीएसटी ते ठाणे दरम्यान धावली होती व या घटनेला गुरूवारी 167 वर्ष पूर्ण झाले आहेत मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्यांदाच प्रवासी रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. दरवर्षी रेल्वेच्या भुसावळ विभागात 10 ते 16 एप्रिल दरम्यान रेल्वे सप्ताह साजरा केला जातो व विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते शिवाय उत्कृष्ट काम करणार्‍या कर्मचार्‍यांना डीआरएम व रेल्वे जी.एम.यांच्या हस्ते गौरवण्यात येते यंदा मात्र कोरोनामुळे ही परंपरा खंड पावली आहे. देशात उद्भवलेली आणिबाणीची परीस्थिती, 1974 सालचा रेल्वे कर्मचार्‍यांचा संप तसेच नैसर्गिक आपत्ती रेल्वे सेवा बंद झाल्याची उदाहरणे असलीतरी कोरोनामुळे प्रथमच अधिक काळासाठी रेल्वे ठप्प झाली आहे. जॉर्ज फर्नाडिस यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे संप पुकारण्यात आल्याने 1974 मध्ये 20 दिवस रेल्वे त्यावेळी ठप्प झाली होती मात्र आत्ताचा कालावधी त्याहून अधिक आहे.

भुसावळ विभागाला 45 कोटींचा फटका
रेल्वेचे जंक्शन म्हणून ओळख असलेल्या भुसावळ येथून दिवसाला सरासरी पॅसेंजर, मेल व एक्स्प्रेस मिळून सुमारे 180 गाड्या हजारो प्रवाशांची वाहतूक करतात तर प्रति दिवस रेल्वेला एक कोटींचे उत्पन्न मिळते मात्र 23 मार्च पासून रेल्वे सेवा ठप्प असल्याने 3 मे पर्यंत 41 कोटींचा फटका बसणार आहे शिवाय माल वाहतुकीद्वारे होणार्‍या उत्पन्नात घट येणार आहे. अत्यावश्यक बाब म्हणून भुसावळ विभागातून सध्या 40 गुडस ट्रेन धावत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रथमच वाढदिवस होणार नाही साजरा
रेल्वे प्रवाशांची लाईफ लाईन असलेली रेल्वे सेवा कोरोनामुळे ठप्प झाली आहे. प्रवाशांना या ऐतिहासिक दिवसाची आठवण राहण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो मात्र कोरोनामुळे पहिल्यांदाच रेल्वेचा वाढदिवस साजरा करता येणार नाही, असे रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील यांनी सांगितले.

Copy