रेल्वेचे तिकीट काढले नाही… घाबरू नका!

0

मुंबई । रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा रेल्वे सुरू होणार असते, आणि तुम्हाला तिकीट खिडकीवरच्या रांगेमुळे तिकीटच मिळत नाही, अशावेळी तिकीटाशिवाय रेल्वेत तुम्ही चढलात तर दंड भरावा लागतो… आता यावरच रेल्वेनं एक नवा उपाय काढलाय.

टीटीईशी तुम्हाला संपर्क करावा लागेल
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही घाईत असाल तर तुम्ही रेल्वे प्रवासादरम्यानही तिकीट घेऊ शकाल. यामुळे प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे फुकट्या प्रवाशांना वेगवेगळी कारणं देता येणार नाहीत. एप्रिल महिन्यापासून रेल्वेनं गाडीतच तिकीट देण्याची व्यवस्था सुरू केलीय. यासाठी तुम्ही प्रवास करत असलेल्या टीटीईशी तुम्हाला संपर्क करावा लागेल. त्यांना आपण तिकीटाशिवाय प्रवास करत असल्याचे सांगून त्याच्याकडूनच तुम्हाला तुमचे तिकीट घ्यायचे आहे.

दहा रूपये अतिरिक्त शुल्क आकारणार
टीटीई तुमच्याकडून तिकीटाच्या शुल्काव्यतिरिक्त 10 रुपये अतिरिक्त शुल्क घेऊन आपल्या हातातील मशिनवरून तिकीट काढून देईल. टीटीईकडे असलेल्या मशीनमध्ये रिकाम्या बर्थचीही माहिती लगेचच मिळू शकेल. वेटिंग क्लीअर झाल्यानंतर रेल्वेत रिकाम्या बर्थची माहिती या मशीनमध्ये उपलब्ध होईल. ही मशीन रेल्वेच्या पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम सर्व्हरशी कनेक्टेड असेल. आरक्षित तिकीट देण्याची ही सुविधा सध्या केवळ सुपरफास्ट ट्रेनमध्येच देण्यात आलीय.