रेमडीसिविर इंजेक्शनचा काळाबाजार; आणखी एकाला अटक

जळगाव- कोरोना महामारीच्या काळात रेमडीसिविर इंजेक्शनच्या काळाबाजारप्रकरणी पोलिसांनी आणखी एका तरुणास बुधवारी दुपारी सिंधी कॉलनीत अटक केली. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सुमारे दीड हजार रुपयात मिळणारे रेमडीसिविर इंजेक्शन गेल्या काही दिवसांपासून काळाबाजारात १५ ते २५ हजार रुपयात विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यासंदर्भात तपासाचे चक्र फिरवताच काही दिवसांपूर्वी पोलिसांनी या इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या १२ जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यानंतर सिंधी कॉलनी परिसरात एक जण रेमडीसिविर इंजेक्शन जास्त दराने विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, नाईक प्रशांत पाठक व त्यांच्या सहकार्‍यांनी सापळा रचला. याप्रकरणी पोलिसांनी मुर्शरफ खान मसूर खान (वय २६, रा.मासूमवाडी) यास अटक केली. हा तरुण साडेपाच हजार रुपयात इंजेक्शन विकत होता. त्याच्या जवळील इंजेक्शन पोलिसांनी हस्तगत केले. याबाबत नाईक प्रशांत पाठक यांनी फिर्याद दिली. त्यावरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.