रेनकोट घालून मनमोहनांचे स्नान

0

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेतला. यात त्यांनी काँग्रेसच्या घोटाळ्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, ’एवढ्या घोटाळ्यांमध्येही मनमोहनसिंगांवर एकही डाग लागला नाही. ’बाथरुममध्ये रेनकोट घालून अंघोळ करण्याची कला डॉ. मनमोहन सिंगांकडून शिकली पाहिजे.’ मोदींच्या या वाक्यानंतर काँग्रेस सदस्यांनी त्यांना कडाडून विरोध केला आणि काँग्रेसने सभात्याग केला. दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या या टिकेवरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून युपीतल्या निवडणुकीत याबाबत जोरदार कलगीतुरा रंगणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

नोटाबंदीचे समर्थन : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यावाद प्रस्तावावर भाषण कराताना मोदीनी भ्रष्टाचाराविरोधातील लढाई ही राजकीय नसल्याचे सांगत नोटाबंदी आणि काळ्या पैशाविरोधात सुरू असलेल्या कारवाईला मिळत असलेल्या यशाचाही उल्लेख यावेळी केला. ते म्हणाले, नोटाबंदीनंतरच्या 40 दिवसांत 700 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. विरोधकांकडून काहूर माजवले जात असतानाही नोटाबंदीच्या निर्णयात सरकारची साथ दिली. सारे जग कॅशलेसच्या दिशेने जात आहे. भारतही त्यात मागे राहता कामा नये. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला लगाम घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नोटाबंदीच्या वादात रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांवर टीका करणे अयोग्य होते असेही मोदींनी सांगितले.

काँग्रेस सदस्यांचा गोंधळ

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरही मोदींनी टीकास्र सोडले. मनमोहन सिंग हे मोठे अर्शशास्त्रज्ञ आहे. अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतरही त्यांच्या चारित्र्यावर कोणताही डाग लागलेला नाही. बाथरूममध्ये रेनकोट घालून आंधोळ करण्याची कला मनमोहन सिंग यांनाच अवगत आहे, अशा शब्दांत टिकास्त्र सोडले. त्यामुळे आधीच संतापलेल्या काँग्रेस सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालत सभात्याग केला.

काँग्रेसचा पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डॉ. मनमोहन सिंगांवर केलेल्या वैयक्तिक टीकेविरोधात काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मोदींनी केलेली टीप्पणी असंसदीस असून, त्यांचे वक्तव्य अहंकारपूर्ण आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. तर पी. चिदंबरम यांनीही मोदींच्या वक्तव्यावर टीका केली आहे. मात्र मनमोहन सिंग यांनी मोदींच्या वक्तव्याबाबत काहीही भाष्य करण्यास नकार दिला आहे.