रेड अलर्ट: मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज

0

मुंबई: काल मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस झाला आहे. मुंबईत पावसामुळे जनजीवन जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका आहे. दरम्यान पुन्हा मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. हवामानतज्ज्ञ आणि हवामान विभागाचे महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दक्षिण कोकणातही पुढचे ४८ तास मुसळधार पाऊस कोसळेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

मुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागात काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडून गेली आहे.

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्य़ात मंगळवारी काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. तर बुधवारी पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Copy