रॅलीतून सुरक्षित वाहतुकीचा संदेश

0

जळगाव : सामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या पोलिस खात्याचा 2 जानेवारी हा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. या निमित्ताने पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विविध संस्था संघटनांमार्फत पोलीस कर्मचारी अधिकार्‍यांचे सत्कार देखील करण्यात आले. तर सकाळी शहरातील विविध शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी नागरिकांमध्ये वाहतूक विषयक जनजागृती व्हावी यासाठी जनजागृती रॅली काढली. स्थापना दिनानिमत्ताने पोलिस साहित्य आणि शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

युवाशक्तीतर्फे साहित्य प्रदर्शन
मागील दोन वर्षापासून काव्यरत्नावली चौकात पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त पोलीस दल व युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे पोलीस दल वापरीत असलेले साहित्य प्रदर्शन केले जात असते. यावर्षी ही शस्त्र, श्‍वान, पोलीस बँड, मोबाईल जॅमर, बायनोक्युलर्स, मानवी तपासणीचे यंत्र यासह अनेक लहान मोठया साहित्याचे प्रदर्शन करण्यात आले. साहित्य प्रदर्शनाला भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन मल्टिपर्पज फाऊंडेशनचे सहकार्य लाभले. 3 रोजी पोलीस बँडचे सार्वजनिक प्रदर्शनाचे तर 4 रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते शस्त्र प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे.

पोलीस दलातर्फे ‘रेझींग डे’
महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधत पोलीस दलातर्फे शहरात सुरक्षित वाहतूक विषयक जनजागृतीपर शालेय विद्यार्थ्याची रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन पोलिस अधिक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते शहर वाहतूक शाखेत करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, पोलीस उपअधिक्षक(गृह) एम.बी.पाटील, उपअधिक्षक सचिन सांगळे, शालीक उईके, अनिल देशमुख, प्रदिप देशमुख, दिलीप पाटील आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.

रॅलीत या विद्यालयांचा सहभाग
सकाळी 9 वाजता काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीत शहरातील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, ला.ना. विद्यालय, आर.आर. विद्यालय, ए.टी.झांबरे, श्रीराम विद्यालय, पुष्पावती गळवे विद्यालय, काशीबाई उखाजी विद्यालय, जयदुर्गा विद्यालय आदी विद्यालयातील सुमारे 800 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून जळगावकरांना वाहतूकी नियमांचे धडे दिले.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तप्रिय पध्दतीत रॅलीत चालून विविध पोस्टरद्वारे वाहतुक नियमांची माहिती दिली.