रिक्षातून प्रवास करणार्‍या महिलेच्या पर्समधून पोत लंपास

0

जळगाव । शहरात आता पुन्हा रिक्षांमधील प्रवाशी महिलांची टेहळणी करुन पर्स लांबविणारी टोळी सक्रिय झाली आहे. मंगळवारी सुभाष चौकातून भावाच्या लग्नासाठी दागिना घेतल्यानंतर घरी निघालेल्या बहिणीच्या पर्समधून २४ हजार रुपये किंमतीची ८ ग्रँम सोन्याची पोत लंपास झाल्याची घटना घडली आहे. मात्र, तक्रार दाखल करण्यासाठी रामानंदनगर, शनिपेठ, शहर पोलीस ठाण्यांमध्ये महिलेची फरफट होत होती. अखेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांची महिलेने भेट घेतल्यानंतर त्यांनी रात्री गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर शेवटी महिलेची फिरफिर थांबली.

खंडेरावनगरात घटना आली लक्षात सोनवद येथील विवाहिता फिरोदास वसिम पिंजारी ह्या भाऊ मेहमूद पिंजारी यांचा रविवारी विवाहसोहळा असल्याने माहेरी आल्या आहेत. फिरोदास पिंजारी ह्या आई सायराबी इकबाल पिंजारी ह्यांच्यासोबत दागिने करण्यासाठी सुभाष चौकात मंगळवारी गेल्या. ४.१५ वाजता सुभाष चौकातील एका ज्वेलर्सकडून पोत व पत्ता अशी आठ ग्रॅमची दागिने घेतली. यानंतर सुभाष चौकातून खंडेरवानगरसाठी रिक्षा क्रमांक एम.एच.-५९५० पिंजारी यांनी रिक्षा केली. रिक्षामध्ये सहप्रवाशी म्हणून एक महिला व एक पुरुष बसले होते. शिवकॉलनी रिक्षा स्टॉपजवळ महिला प्रवाशी उतरुन गेल्या. खंडेरावनगरातील रिक्षा स्टॉपजवळ पैसे देत असतांना पर्स मधील दागिने लंपास झाल्याचे पिंजारी यांच्या लक्षात आले.

तक्रारदार महिलेची फरफट

दागिने लंपास झाल्याचे फिरोदास पिंजारी यांनी वडील इकबाल रहेमान पिंजारी (वय ४६) यांना सांगितले. परिवारातील काही सदस्यांसह ते सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलीस ठाण्यामध्ये आले. याठिकाणी पोलीसांनी त्यांना शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पाठविले. शनिपेठ पोलीसांनी पुन्हा रामानंदनगर, रामानंदनगर पोलीसांनी पुन्हा शहर पोलीस ठाणे पाठविल्याने तक्रारदार महिलेला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, अखेर महिलेने शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकूर यांची भेट घेतली यानंतर त्यांनी तक्रार दाखल करून घेण्याचे आश्‍वासन दिले.