रा.स्व.संघाचे प्रांत संघचालक मधुकर जाधव यांचे निधन

औरंगाबाद: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत संघचालक मधूकर श्रीरंग जाधव उर्फ दाजी (६२) यांचे शनिवारी  (दि.१७) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. सायंकाळी सिडकोतील एन सहा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई,पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.                मूळचे परभणी जिल्ह्यातील भोगाव (ता. जिंतूर) येथील रहिवासी असणाऱ्या दाजी जाधव यांचे महाविद्यालयीन शिक्षण परभणीच्याच शिवाजी महाविद्यालयात झाले. बीएसएनएलच्या अधिकारीपदावरून ते निवृत्त झाले होते. औरंगाबाद, जालना, परभणी, ठाणे, वापी येथे त्यांनी सेवा बजावली. संघाचे औरंगाबाद जिल्हा कार्यवाह, विभाग कार्यवाह, प्रांत कार्यवाह, क्षेत्रीय संपर्क प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या. आध्यात्मिक पिंड, संत तुकारामांच्या जीवनकार्याचा प्रभाव असलेल्या जाधव यांचे ‘अभंगमधू’ हे पुस्तकही प्रसिध्द आहे. २०१८ पासून दाजी जाधव देवगिरी प्रांताचे संघचालक म्हणून कार्यरत होते.