राहुल गांधी ‘त्या’ वक्तव्यावर ठाम, माफी मागणार नसल्याचे स्पष्टीकरण !

0

नवी दिल्ली: झारखंड येथील प्रचारसभेत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर आरोप करताना देशाची वाटचाल ‘मेक इन इंडियाकडून रेप इन इंडिया’कडे होत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून आज शुक्रवारी लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्याकडून महिलांचा अपमान झाला असल्याने त्यांनी माफी मागावी अशी मागणी करत गदारोळ केला. दरम्यान राहुल गांधी यांनी ते आपल्या भूमिकेवर ठाम असून माफी मागणार नसल्याचे जाहीर केले आहे. महत्वाच्या मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठी माझ्यावर आरोप केले जात आहेत असा प्रती आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

मोदी पंतप्रधान नसताना त्यांनी देश रेप कॅपिटल झाले असल्याचे आरोप करत होते, आज ते पंतप्रधान असताना बलात्काराच्या घटना घडल्या आहे. यावर मात्र ते काही बोलत नसल्याचे आरोप राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी मोदींचा पंतप्रधान नसताना केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. मोदींनी त्यांच्या वक्तव्यावरून माफी मागावी असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.