राहुल गांधींनी शब्द जपून वापरावे; राफेल करार रद्द होणार नाही-जेटली 

0
नवी दिल्ली: राफेल विमान खरेदीवरुन मोदी सरकारवर सर्वत्र टीका होत आहे. काँग्रेसने सरकारला व विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने मोदींवर आरोप करीत आहे. दरम्यान अर्थमंत्री अरुण जेटलींनी प्रत्युत्तर दिले आहे. टीका करताना शब्दांचा वापर जपून करा, असा सल्ला जेटलींनी राहुल यांना दिला आहे.
राफेल डीलवरुन राहुल गांधी सतत करत असलेल्या आरोपांमुळे मोदी सरकार मोठ्या अडचणीत आले आहे. त्यातच फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या विधानाने भाजपा सरकारच्या अडचणीत भर घातली आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अरुण जेटलींनी काँग्रेसचे सर्व आरोप बिनबुडाचे असून राफेल करार रद्द होणार नाही, असे सांगितले आहे.
मोदी सरकारकडून राफेल करारासाठी अनिल अंबानींच्या रिलायन्सचं नाव सुचवण्यात आलं होतं. मोदी सरकारनं केवळ एकच नाव सुचवल्यानं फ्रान्सच्या डॅसो एव्हिऐशन कंपनीकडे इतर कोणताही पर्याय नव्हता, असं विधान फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी केलं होतं. यावरुन राहुल गांधींनी मोदींवर टीकेची झोड उठवली. फ्रान्सचे माजी अध्यक्ष मोदींना चोर म्हणाले. आता तरी मोदींनी मौन सोडावं, अशा तिखट शब्दांमध्ये राहुल यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केलं. राहुल यांनी केलेल्या टीकेचा अरुण जेटलींनी समाचार घेतला. ‘सार्वजनिक सभा लाफ्टर चॅलेंज नसतात. कोणालाही जाऊन मिठी मारली, डोळा मारला, चुकीची विधानं केली, अशा गोष्टी करणं सोपं असतं. लोकशाहीत तुम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे. मात्र त्यासाठी शब्दांची निवड काळजीपूर्वक करायला हवी,’ अशा शब्दांत जेटलींनी राहुल यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.
फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या विधानाचा आणि राहुल गांधींनी 30 ऑगस्टला केलेल्या ट्विटचा संबंध असावा, असा संशयदेखील जेटलींनी व्यक्त केला.
https://twitter.com/RahulGandhi/status/1035378911327256576
‘भ्रष्टाचाराचे जागतिकीकरण. दोन आठवड्यांमध्ये मोठे बॉम्ब पडणार आहेत. मोदीजी कृपया अनिल यांना सांगा, फ्रान्समध्ये मोठी अडचण झाली आहे,’ असे ट्विट राहुल यांनी 30 ऑगस्टला केले  होते.
त्याचा संदर्भ देत हा संपूर्ण घटनाक्रम पद्धतशीरपणे तयार करण्यात आला असावा, अशी शक्यता जेटलींनी व्यक्त केली. ‘पॅरिसमध्ये दोन आठवड्यानंतर मोठे बॉम्ब पडणार असल्याचं राहुल 30 ऑगस्टला म्हणतात आणि त्यानंतर फ्रान्सवा ओलांद काही विधानं करतात. हे सर्व जुळवून आणले असावे असा संशय जेटलींनी व्यक्त केला.