राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची लोकप्रियता वाढतेय

0

लखनऊ । उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील होणार्‍यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशात 11 मार्च रोजी विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यातच संघ प्रवेशासाठी हजारो ऑनलाइन अर्ज आले. 16 ते 31 मार्चदरम्यान 22 हजार 432 अर्ज मिळाले, ही संख्या विक्रमी असून यातील 8,919 अर्ज उत्तर प्रदेशातून तर 1680 अर्ज दिल्लीतून मिळाले आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मागील 3 वर्षांत प्रत्येक महिन्याला 7 हजार जणांनी संघात प्रवेशासाठी अर्ज केला होता, तर योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होताच हा आकडा 31 हजार 637 पर्यंत पोहोचला. हे प्रमाण 2014 च्या निवडणुकीनंतर संघात प्रवेश करणार्‍यांपेक्षा 4 पट अधिक आहे.

1 ते 15 एप्रिलदरम्यान 9 हजार 205 ऑनलाइन अर्ज आले, त्यातील 2 हजार 788 अर्ज एकट्या उत्तर प्रदेशातून आले होते. हे प्रमाण आमच्यासाठी विक्रमी असून हा आकडा फक्त ऑनलाइन प्रणालीतील आहे. इतर मार्गाने जे स्वयंसेवक झाले आहेत, ते प्रमाण आणखीनच विक्रमी असल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिका़र्‍याने केला. 1 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत संघाला 41 हजार 134 अर्ज मिळाले आहेत.

पश्‍चिम बंगालमध्ये वाढता प्रतिसाद
यावर्षी संघाने पश्‍चिम बंगालमध्येदेखील सदस्यसंख्येत चांगली वाढ नोंदवली आहे. या राज्यात 1 जानेवारी ते 15 एप्रिलदरम्यान 3 हजार 422 अर्ज संघाला मिळाले. संघाने पश्‍चिम बंगालची दोन हिश्श्यात विभागणी केली असून उत्तर आणि दक्षिण अशी विभागणी संघाने केली आहे. आम्ही बंगालमध्ये वेगाने वाढत आहोत, यावर्षी संघाच्या केंद्रीय समितीने एक प्रस्ताव संमत केला आहे. 2013 साली संघाला 28 हजार 424 अर्ज मिळाले होते. परंतु, 2014 मध्ये मोठा बदल घडून आला. त्यावर्षी संघाला 97047 अर्ज मिळाल्याचे संघाच्या एका प्रचारकाने सांगितले. 2015 साली 81,620 आणि 2016 साली 84941 अर्ज मिळाले होते.