राष्ट्रीय संघटनेचा वाद पोहोचला राज्य संघटनांपर्यंत!

0

मुंबई : भारतीय राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघटनेमध्ये रंगलेला वाद आता राज्य संघटनेपर्यंत पोहोचला आहे. अध्यक्ष विरुद्ध सचिव या सामन्याचे पडसाद महाराष्ट्र राज्य संघटनेवरही उमटले आहे. शेगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा संघटनांच्या विशेष सर्वसाधारण सभेत राज्य संघटनेचे अध्यक्ष विजय डांगरे यांनाच पदमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डांगरे यांनी मात्र हा निर्णय अवैध असल्याचे स्पष्ट केले आहे.

लढाई राज्य संघटनांपर्यंत
संघटनेच्या राष्ट्रीय पातळीवर अध्यक्ष चौधरी अवधेश कुमार आणि सचिव रामअवतार सिंह जखार यांच्यातील लढाई राज्य संघटनांपर्यंत पोहोचली आहे. शुक्रवारी त्याचे पडसाद महाराष्ट्र राज्य संघटनेत पाहायला मिळाले. जखार यांच्या मान्यतेने आयोजित राष्ट्रीय स्पर्धामध्ये महाराष्ट्राचे संघ न पाठवण्याचा निर्णय डांगरेंनी घेतल्यामुळे जिल्हा प्रतिनिधींनी त्यांच्याविरोधात आवाज उठवल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

जिल्हा प्रतिनिधींची बैठक
शेगांव येथे विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आणि डांगरे यांना पदमुक्त करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. २४ जिल्हा प्रतिनिधींच्या बैठकीत प्रभारी अध्यक्ष म्हणून रतन लिगाडे यांची निवड केली आहे. शिर्डी येथे झालेल्या बैठकीत सूर्यवंशी यांना सचिवपदावरून निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे आजची ही बैठक अवैध आहे. रविवारी नागपूर येथे विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले असून त्यात पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती डांगरे यांनी दिली.