राष्ट्रीय रविदास परिषदेच्या वतीने संविधान सन्मान

0

चाळीसगाव । राष्ट्रीय रविदास परिषदेच्यावतीने संविधान सन्मान समाज जोडो अभियानाला सुरवात झाली असून यानिमित्त पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव येथून 1 जानेवारीपासून छत्रपती शाहू महाराज अभिवादन रॅलीला सुरुवात झाली असून ही रॅली संपूर्ण महाराष्ट्रभर फिरुन रॅलीचा समारोप 13 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता मुंबई आझाद मैदान येथे होणार असल्याची माहिती रविदास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सी.के.जाधव व पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी परिषदेचे राष्ट्रीय महासचिव अशोक आगवणे, प्रदेशउपाध्यक्ष किशोर लांडगे, सोलापूर जिल्हाउपाध्यक्ष मधूकर शिंदे, राज्यप्रवक्ता दिनेश देवरे, युवा जिल्हाध्यक्ष स्वप्निल मोरे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार ओबीसी समाजाचे नेते तथा ज्येष्ठ पत्रकार माजी सरपंच किसनराव जोर्वेकर यांनी केला.

उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
यावेळी बोलतांना सी.के.जाधव यांनी सांगितले की, राष्ट्रीय रविदास परिषदेच्या वतीने समाज जोडो अभियानाला सुरुवात झाली असून चर्मकार समाज एकत्रीत करणे गरजेचे असून गरजेचे असल्याचा उद्देश या मागचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अशोक अगवणे यांनी बोलतांना सांगितले, चर्मकार समाजाच्या उद्धारासाठी शासनाने रविदास आर्थिक विकास महामंडळ मर्यादितसाठी 500 कोटींचे अनुदान दिले पाहिजे. तसेच संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळमध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकारी व काही लोकांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असून याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच रविदास महाराजांचे राज्यात मोठे स्मारक व्हावे, हा या अभियानाचा उद्देश असल्याचे सांगितले. तर जळगाव जिल्ह्याच्या चर्मकार संघटनेच्या एका नेत्याने रविदास महाराज यांची जयंती झाल्यानंतर त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 7 दिवसानंतर जयंती व वाढदिवस एकाच दिवशी साजरा केला गेल्याचे राज्य प्रवक्ते दिनेश देवरे यांनी सांगितले. संत रविदास महाराज यांची जयंती झाल्यानंतर देखील स्वत:च्या वाढदिवसाच्या दिवशी जयंती केली ही काळीमा फासणारी गोष्ट असून त्याचा निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.