राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेखला दणका

पोलिसांचा बी समरी रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला

औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याच्यावर बलात्काराच्या दाखल गुन्ह्यात काहीही तथ्य नसल्याचा पोलिसांनी दिलेला बी समरी अहवाल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सचिन न्याहारकर यांनी फेटाळला. या प्रकरणात राजकीय दबावाखाली तपासी अधिकार्‍यांनी तपास केल्याचे दिसत आहे. फिर्यादी तथा पीडितेच्या म्हणण्याऐवजी आरोपीच्या म्हणण्याच्या अनुषंगाने तपास करण्यात आला. तसेच फिर्यादीलाच या प्रकरणात खोटे ठरवण्याचा प्रयत्न केलेला दिसत असून या प्रकरणात आता सिडको पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी तपास करावा, पोलीस आयुक्तांनी यामध्ये योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन करावे, असेही न्यायालयाने आदेशात म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या बी समरी अहवालात सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी योग्य ते पुरावे जोडलेले नसून स्वीकारणे योग्य नाही. त्यामुळे हा अहवाल रद्द करावा, असे न्यायालयात सांगितले. सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ यांनी बी समरी अ्हवाल न्यायालयात सादर केला आहे. याप्रकरणी पीडितेने आपले म्हणणे मांडण्यासाठी अ‍ॅड. आय. डी. मनियार यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब ईब्राहिम शेख (रा. शिरूर जि. बीड) यांच्याविरुद्ध २८ डिसेंबर २०२० रोजी सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ वर्षीय पीडित तरुणी उच्च शिक्षित असून औरंगाबादेतील बायजीपुरा भागात भाड्याने राहते. नोकरीचे आमिष दाखवून मुंबईला नेण्यासाठी म्हणून १४ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री शेख यांनी कारमध्येच अत्याचार केला. आपण प्रतिकारही केला. मात्र, तोंड दाबून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हे प्रकरण समोर आले तेव्हा औरंगाबाद खंडपीठानेही पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले होते.

Copy