राष्ट्रवादी मध्यावधी निवडणुकांसाठी सज्ज!

0

मुंबई  । शिवसेना-भाजप हे राज्यात सत्तेवर असलेलेच महानगरपालिका निवडणुकात वेगवेगळे लढत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. परंतु, राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे धैर्य शिवसेनेत नाही. उद्धव ठाकरे यांच्यात दम असेल तर त्यांनी पाठिंबा काढून घ्यावा, असे आव्हान देत आम्ही मध्यावधी निवडणुकांसाठी सज्ज आहोत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले. हे सरकार पडले तरी आम्ही कुणालाही पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट करत निवडणुका झाल्यास राष्ट्रवादीला 150 जागा मिळतील असा विश्वासही व्यक्त केला.

आम्ही निवडणुकीला तयार…
भाजपने माफिया, खुनी लोकांना उमेदवारी दिली आहे. मतदार अशा गुंडांना मतदान करणार नाहीत. तर दुसरीकडे शिवसेना मोदींचा कट्टर विरोधक हार्दिक पटेलला मुंबईत आणते. त्यामुळे या वेळी वेगळेच चित्र पाहायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत सरकार पडेल. मध्यावधी निवडणुका होतील. आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही, असे राष्ट्रवादीचे पक्षप्रवक्ते नवाब मलिक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले. या निवडणुकांसाठी आम्ही तयार आहोत. आता निवडणुका झाल्यास आम्हाला 150 जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

एमआयएम – भाजपचे लागेबंधे
मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसबरोबरील आघाडीबाबतही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, निवडणुकीच्या दोन महिनेआधीच राष्ट्रवादीने आपली पहिली उमेदवारी जाहीर केली होती. आम्ही 173 ठिकाणी उमेदवार दिले आहेत. उर्वरित जागेवर काँग्रेस काय करते ते पाहू. काँग्रेसमध्ये सुरू असलेला वाद हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. एमआयएम आणि भाजपचे लागेबंधे असल्याचा आरोपही त्यांनी केला. एमआयएमचे प्रमुख ओवेसी हे मुळचे महाराष्ट्राचे आहेत. त्यांच्या गावातील लोकांनीच त्यांना मतदान केले नाही. तिथे राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांना विशेष यश मिळणार नसल्याचे ते म्हणाले.