राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील घाबरट ; दुटप्पी भूमिका आली समोर

Nationalist District President Ravindra Bhaiyya Patil panicked; A double role came forward भुसावळ : भुसावळातील राजकारणात बाहेरच्या नेत्यांचा हस्तक्षेप कदापि मान्य केला जाणार नाही, आमचे केवळ एकच नेतृत्व असून ते म्हणजे शरद पवार असून त्यांनाच आम्ही मानतो. जळगाव जिल्हा बँकेत जे सहन केले ते भुसावळ पालिकेत कदापि सहन केले जाणार नाही, असा परखड इशारा माजी आमदार संतोष चौधरी यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता बुधवारी सायंकाळी पत्रकार परीषदेत दिला. चौधरी म्हणाले की, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्या पाटील हे घाबरट नेते असून त्यांची दुटप्पी भूमिका समोर आल्याने पक्षश्रेष्ठींच्या कानावर ही बाब टाकण्यात आली आहे.

अर्ज वाटपाची मोहिम आता थांबणार नाही
माजी आमदारांच्या कार्यालयात मंगळवारी आगामी पालिका निवडणूक व राष्ट्रवादी सदस्य नोंदणीबाबत सविस्तर बैठक झाली. त्यात आगामी पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांचे फार्म शहराध्यक्षांकडून तर जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुकाध्यक्षांकडून घेण्याचे ठरले व मोहिमेचा शुभारंभ जिल्हाध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला मात्र या बैठकीला माजी मंत्री खडसे गटातील समर्थक उपस्थित नसल्याने दुफळी समोर आली व एका गटाने पक्षश्रेष्ठींकडे मंगळवारच्या बैठकीबाबत तक्रार करण्यात आल्यानंतर फार्म वाटप तूर्त थांबवण्याचे आदेश जिल्हाध्यक्षांनी शहराध्यक्ष व तालुकाध्यक्षांना दिले होते. जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत फार्म वाटप मोहिम सुरू झाली असताना त्यांनी फार्म वाटपाला स्थगिती दिल्यानंतर माजी आमदार चौधरींनी जिल्हाध्यक्षांच्या दुटप्पी भूमिकेवर बुधवारी बोट ठेवत जोरदार टिकास्त्र सोडले. राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्या कार्यालयात बुधवारी सायंकाळी सहा वाजता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रसंगी शहराध्यक्ष नितीन धांडे, तालुकाध्यक्ष दीपक मराठे व पदाधिकारी उपस्थित होते.

खडसेंना सूचक इशारा : हस्तक्षेप सहन करणार नाही
माजी आमदार चौधरी आपल्या स्टाईलमध्ये म्हणाले की, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जे घडले ते अत्यंत वेदनादायी होते मात्र मन घट्ट करून ते स्वीकारले मात्र आता भुसावळ पालिकेच्या बाबतीत ते खपवून घेतले जाणार नाही. राज्यस्तरीय नेत्यांचा हस्तक्षेप भुसावळात मी कदापि खपवून घेणार नाही शिवाय त्यांना मानणार्‍या कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय नेत्याला तालुकास्तरीय वा प्रा.लि.करू नये, असा टोलाही त्यांनी कुणाचेही नाव न घेता लगावला.

राष्ट्रवादीच्या फार्ममधील आक्षेपार्ह बाब दाखवण्याचे आवाहन
चौधरी म्हणाले की, मुळात जिल्हाध्यक्षांच्या सांगण्यावरूनच बैठक बोलावण्यात आली शिवाय अ‍ॅड.पाटील यांना इच्छूकांना वाटपाबाबतचा फार्मदेखील दाखवण्यात आला व त्यात केवळ शरद पवार यांचा फोटो शहराध्यक्ष व तालुकाध्यक्षांची नावे आहेत त्यामुळे अन्य लोकांना (खडसे समर्थकांना उद्देशून) जिव्हारी लागण्यासारखे काहीही नाही. हा काही एबी फार्म नाही त्यामुळे एबी फार्म मिळवण्यासाठी संबंधितांनी आपली ताकद लावावी, असे सूचक विधान करून त्यांनी पक्ष आपल्याच बाजूने असल्याचे एकप्रकारे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांची दुटप्पी भूमिका समोर आली असून ते घाबरट असल्याचे यातून दिसून येते. त्यांना कुणी घाबरवत असल्यास त्यांनी आम्हाला सांगावे, आम्ही त्यांच्यासोबत आहोत.

तर पक्ष श्रेष्ठींना देणार उत्तर
चौधरी म्हणाले की, जिल्हाध्यक्षांना फार्म वाटप करायचे नव्हते तर मग का त्यांनी फार्म वाटप केले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आम्ही आमचे काम सुरूच ठेवणार असून आतापर्यंत 180 इच्छूकांना फार्म वाटप केल्याचा दावा त्यांनी करीत पत्रपरीषदेतही इच्छूकांना फार्म वाटप केले. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्याशी याबाबत बुधवारी सकाळी चर्चा केली, त्यांनादेखील फार्म पाठवला शिवाय पत्रपरीषदेची त्यांना कल्पना दिल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकाराबाबत जे काही सांगायचे ते वरीष्ठांना सांगू, असेही ते म्हणाले.

केवळ खडसेंना नेते मानणार्‍यांना सुनावले
खडसेंचे नाव न घेता ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी सर्वांना निरोप देण्यात आले मात्र विशिष्ट ठिकाणी बैठक घेण्यासाठी हा काही भाजपा पक्ष नाही त्यामुळे ज्यांना एखाद्या नेत्याविषयी निष्ठा असेल त्यांनी ती खुशाल ठेवावी मात्र नेत्यांना प्रा.लि.करू नये, असेही त्यांनी बजावले. जे राज्याचे नेते आहेत त्यांना तालुकास्तरीय करू नये, असेदेखील सांगण्यास ते विसरले नाहीत. पक्ष जो निर्णय देईल तो आपल्याला मान्यच असेल मात्र जो निवडून येणार नाही तोच नसती उठाठेव करीत असल्याचे ते कुणाचेही नाव न घेता म्हणाले. पक्षात आल्यानंतर पक्ष विरोधी काम चालणार नाही, एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी करीत भुसावळ तालुक्याचे नेतृत्व कुणी करावे हे शरद पवार साहेबच ठरवतील, असेही ते म्हणाले.

खडसे म्हणाले : पक्षाचा आदेश मान्य
माजी आमदारांनी केलेल्या आरोपांबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पक्ष नेतृत्व जे आदेश आम्हाला देईल तेच आम्हाला मान्य असतील, त्याप्रमाणेच आम्ही काम करू तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी पत्रकार परीषदेतील आरोपांबाबत कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.