राष्ट्रवादी काँग्रेसला आर्थिक टंचाईने ग्रासले!

0

पिंपरी-चिंचवड : महापालिका निवडणुकीत सत्तेची हॅट्ट्रीक साधण्यासाठी सज्ज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला यंदा नोटाबंदीचा सर्वाधिक फटका बसला असल्याचे जाणवते आहे. पक्षाला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत असून, पक्षाकडे फंड नसल्याचे रडगाणे पक्षाचेच पदाधिकारी गात आहे. भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या प्रमाणात होणारा जाहिरातींचा भडिमार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घणाघाती सभा, सोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची झालेली जबरदस्त जाहीर सभा या सर्व घडामोडी पाहाता, राष्ट्रवादी काँग्रेस प्रचारात कमालीची मागे पडली आहे. सोशल मीडियावरदेखील राष्ट्रवादीची पिछेहाट दिसत असून, इतर पक्षाच्या स्थानिक उमेदवारांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असताना प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियावरदेखील राष्ट्रवादीला ‘प्रचार टंचाई’चा सामना करावा लागत आहे. याबाबत पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर तथा स्थानिक नेते योगेश बहल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘फंड उपलब्ध झाला नाही’ अशी माहिती दिली.

प्रसिद्धी व प्रचारामुळे भाजपची जोरदार लाट

राष्ट्रवादी काँग्रेससारख्या आर्थिकदृष्ट्या सक्षम पक्षावर पहिल्यांदाच आर्थिक टंचाईचे संकट कोसळले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा हा फटका असल्याचे मानले जात आहे. भारतीय जनता पक्षाने वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांना भरमसाठ जाहिराती देऊन जोरदार वातावरण निर्मिती केली असताना, महापालिकेत सत्ताधारी असतानाही राष्ट्रवादीला वातावरण निर्मितीत अद्याप अपयशच आले आहे. मतदानासाठी अवघे दोन दिवस उरले असताना, राष्ट्रवादीचे नेते वातावरण निर्मितीत अपयशी ठरले. ठराविक भागात स्थानिक उमेदवार आर्थिकदृष्ट्या चांगले असल्याने त्यांनी आपआपल्यापुरता प्रसारमाध्यमांचा वापर करून घेतला आहे. परंतु, बहुतांश भागात पक्षाच्या उमेदवारावर दारुण वेळ आली आहे. शहरातील दिग्गज नेते आ. लक्ष्मण जगताप, आ. महेशदादा लांडगे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून भाजपशी घरोबा केल्यानंतर पक्षाकडे चांगला असा स्थानिक चेहरा नाही. स्वतः अजित पवारांना प्रचाराची धुरा सांभाळावी लागत आहे. त्यातच प्रसिद्धी व प्रचारासाठी फंड नसल्याने पक्षाच्या प्रसिद्धी व प्रचाराचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे चोहीकडे भाजपची जोरदार लाट निर्माण करण्यात भाजपनेत्यांना यश आले असून, त्याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीलाच बसणार आहे.

शरद पवारांचे सोशल इंजिनीअरिंग; प्रमुख लोकांशी फोनाफोनी!

पिंपरी-चिंचवडसारख्या पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा घटणार असल्याचा गोपनीय अहवाल पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर गेला आहे. त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पवारांचा फोन येऊन गेला असून, सोशल इंजिनीअरिंगचा वेगळा प्रयोग पवार करत आहेत. असाच प्रयोग त्यांनी पुण्यातदेखील चालवलेला आहे. साहित्य, आयटी, कला, राजकारण, समाजकारण व सेवा या क्षेत्रातील विविध मान्यवरांशी पवार चर्चा करत असून, त्यांनी नुकतीच पुण्यात व्यापारीवर्गाची एक बैठकदेखील घेतली होती. या बैठकीला पिंपरी-चिंचवड शहरातूनदेखील व्यापारी मंडळी गेली होती. त्यात त्यांनी मोदींच्या नोटाबंदी निर्णयाचे धोके लक्षात आणून दिले. तसेच, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून मोदी लाट गेली की नाही, याची चाचपणीदेखील केली. या दोन्हीही शहरात तूर्त तरी मोदी लाट नाही, असे निरीक्षण पवारांच्या निदर्शनास आले आहे. या शिवाय, या दोन्ही शहरातील अल्पसंख्यांक नेत्यांशीदेखील पवारांची चर्चा केली असून, लोकांचा काय कल आहे, याची माहिती घेतली आहे. त्यानुसार, शेवटच्या दोन दिवसांत पवारांच्या महत्त्वपूर्ण सभा होणार असल्याचेही पक्षाच्या सूत्राने सांगितले.