राष्ट्रवादीसोबत दोन वर्षांपूर्वीच सरकार स्थापन करण्याचा विचार होता: फडणवीसांचे खळबळजनक विधान

0

पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय घडामोडी संपूर्ण देशाला ज्ञात आहे. निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मात्र तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत दोन दिवसासाठी सरकार स्थापन केले होते. मात्र त्यानंतर पुन्हा अजित पवार स्वगृही दाखल झालेत. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन दोन वर्षांपूर्वीच सरकार स्थापन करण्याचा आमचा विचार सुरू होता. मात्र पक्षातील वरिष्ठांनी त्याला परवानगी दिली नाही असे खळबळजनक वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अजित पवार यांनी आमच्यासोबत येण्याचा निर्णय स्वतः घेतलेला नव्हता, त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना याची कल्पना होती असेही त्यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने लागला असता तर आमचे सरकार टिकले असते असे विधानही त्यांनी केले आहे. राज्यातील तीन पक्षाचे सरकार कसे काम करत आहे हे संपूर्ण राज्याला ठाऊक आहे. हे सरकार पडण्याचा आमचा कोणताही विचार नाही तो आमचा अजेंडा ही नाही मात्र हे सरकार कोसळण्यासाठी दीर्घकाळ प्रतिक्षाही करावी लागणार नाही असे सूतोवाच ही त्यांनी केले.

Copy