Private Advt

राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसला : नाना पटोले

नागपूर : महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद आता समोर येऊ लागले आहेत. त्यातच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसल्याचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात मौठी खळबळ उडाली आहे.

अंतर्गत वादाने खळबळ
विदर्भात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे नाना पटोले यांच्याशी असलेले राजकीय वैर सर्वश्रुत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा जिल्ह्यात भाजपशी युती केली. त्यामुळे अनेक पंचायत समित्यांमध्ये संख्याबळ अधिक असूनही नाना पटोलेंना जिल्ह्यात काँग्रेसला सत्तेबाहेर राहावे लागले. राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून अनेक वाद होऊन देखील अद्याप शाबूत असलेल्या महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद आता समोर येऊ लागले आहेत.

राष्ट्रवादीवरच केला गंभीर आरोप
भंडार्‍यात भाजपा व राष्ट्रवादीचा काँग्रेसला सुरुंग लावण्याचा प्रयत्न होता. भाजपाने राष्ट्रवादीशी युती करत जिल्हा परिषदेत सत्ता हस्तगत करून काँग्रेसची कोंडी केली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे नाना पटोले यांच्याशी असलेले राजकीय वैर सर्वश्रुत असून राज्यात दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत असताना येथे राष्ट्रवादीने भाजपाशी हातमिळवणी करणे अनेकांना खटकले आहे. गोंदिया जिल्हा परीषदेच्या पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत नाना पटोले विरुद्ध प्रफुल्ल पटेल हा वाद पुन्हा एकदा उघड झाला आहे. त्यामुळे नाना पटोलेंनी त्यावरून आपल्या ट्विटर हँडलवर ट्वीट करीत थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर पाठीत सुरा खुपसल्याचा आरोप केला आहे.

तर नक्कीच विचारणार जाब
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातत्याने कुरघोड्या सुरू असून मैत्रीचा हात पुढे करीत राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. याचा जाब त्यांना नक्कीच विचारणार असे नाना पटोले यांनी ट्वीट केले आहे.