रावेर व यावल तालुक्यातील जिल्हा परीषदेच्या अखत्यारीतील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग

0

आमदारी हरीभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांना यश ; निधीच्या तरतूदीनंतर प्रत्यक्षात होणार कामांना सुरुवात

यावल- जिल्हा परीषदेकडून निधीअभावी येणार्‍या अडचणींमुळे ग्रामीण भागातील कणा असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती रखडली होती. ही समस्या सोडवण्यासाठी आमदार हरीभाऊ जावळे यांनी जिल्हा परीषदेच्या अखत्यारीतील सुमारे 200 किलोमीटर अंतरावरील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यास मंजुरी दिली असून रावेर मतदारसंघातील एकूण 124 तर यावल तालुक्यातील 78 किलोमीटर रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून मंजूर करण्यात आले आहेत.

पालकमंत्र्यांनी वर्ग केले रस्ते
रावेर विधानसभा मतदार संघात येणार्‍या सुपीक जमिनीमुळे रस्ते वारंवार खराब होत असल्याने आमदार हरीभाऊ जावळे यांच्या प्रयत्नांनी जिल्हा परीषद बांधकाम विभागाकडून रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष सहकार्याने हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले. जिल्हा परीषदेकडून रस्त्यांसाठी निधीची मर्यादा असल्याने त्यांना दुरुस्तीसाठी अडचणी येतात तसेच हे रस्ते रावेर मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आल्यामुळे या रस्त्यांची लवकरच दुरुस्ती करून त्यांचे नुतनीकरण देखील नोव्हेंबर महिन्यात अधिवेशनात मंजुरी घेऊन करण्यात येणार आहेत. यात जिल्हा परीषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग दर्ज्जोन्नती देण्यात आलेली आहे.

या रस्त्यांना मिळाला जिल्हा मार्गाचा दर्जा
रावेर तालुक्यातील कोचुर-चिनावल-उटखेडा, मुंजलवाडी-रसलपूर-केर्‍हाळे, भोकरी-तामसवाडी-खिरवड, नेहता-दोधे-अटवाडे-खानापूर-निरूळ-पाडले ते राज्य सीमेपर्यंत 52 किलोमीटरच्या रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग 70 म्हणून दर्जा देण्यात आला. शिवाय केर्‍हाळे-पिंप्री-अहिरवाडी-कर्जोद-वाघोड-मोरगाव ते नेहेता अशा 16 किलोमीटरच्या रस्त्या प्रमुख जिल्हा मार्ग 71 तसेच खिरोदा-फैजपूर-रोझोदा-चिनावल-विवरा-उटखेडा-कुसुंबा दरम्यानच्या 27 किलोमीटर अंतराच्या रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग 72 व कुंभारखेडा-चिनावल-वाघोदा-निंभोरा दरम्यानच्या 13 किलोमीटर अंतराच्या रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग 73 चा दर्जा देण्यात आला. यावल तालुक्यासाठी मारूळ-हंबर्डी-भालोद-पिळोदा-ते राज्यमार्ग 43 पर्यंतच्या 25 किलोमीटरच्या अंतराला प्रमुख जिल्हा मार्ग 75 तसेच डोंगरदे ते डोंगरकठोरा-बोरखेडा खुर्द- हिंगोणा-बामणोद-वनोली-कोसगाव-दुसखेडा दरम्यानच्या 35 किलोमीटरच्या रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग 76 तसेच फैजपूर-पिंपरूड-वढोदा-करंजी-रीधुरी-दुसखेडा या 18 किलोमीटर रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग 77 चा दर्जा देण्यात आला.

लवकरच रस्त्यांची होणार दुरुस्ती -आमदार जावळे
जिल्हा परीषदेकडे रस्त्यांच्या कामासाठी निधीची अनेकदा मर्यादा येत असल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे करताना अनेक अडचणी येत होत्या. या रस्त्यांना दर्जोन्नती देण्यात आल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना, नाबार्ड, बजेट यासह अन्य निधीची तरतूद करता येत असंल्याने रस्त्याची समस्या सुटणार असल्याचे आमदार हरीभाऊ जावळे म्हणाले.

Copy