रावेर मतदारसंघातील रस्त्यांच्या भ्रष्ट्राचार प्रकरणी अधिवेशनात तक्रार

तारांकीत प्रश्न उपस्थित करत आमदार शिरीष चौधरींनी केली चौकशीची मागणी

रावेर : रावेर मतदारसंघातील रस्त्यांमध्ये भ्रष्ट्राचार झाल्याप्रकरणी आमदार शिरीष चौधरी यांनी हिवाळी अधिवेशनात ऑनलाईन तारांकीत प्रश्न उपस्थित करीत चौकशीची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाची कामे होत असून या कामांबाबत अनेकदा ‘जनशक्ती’ने वेळोवेळी आवाज उठवला होता. या बाबीला कारणीभूत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांवर आता कारवाईची अपेक्षा सुज्ञ नागरीक व्यक्त करीत आहेत. निकृष्ट कामांबाबत खुद्द आमदारांनी आवाज उठवल्यानंतर दोषींवर नेमकी कशी व काय कारवाई होते? याकडे आता नागरीकांचे लक्ष लागले आहे.

निकृष्ट कामांबाबत आमदारांची तक्रार
रावेर तालुक्यात करोडो रुपये खर्च करून शासनाकडून रस्त्यांची कामे करण्यात आली मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे (मटेरीयकल) शासनाचा हा निधी पाण्यात गेल्याची भीती आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार झाल्याची ओरड असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष झाल्यानेच कंत्राटदारांचे फावले व अल्पावधीतच रस्ते रखडले आहेत. नवीन रस्त्यांचा दर्जा घसरत असल्याने जनतेत नाराजीचा सूर उमटत असतानाच या प्रकरणी आमदार शिरीष चौधरी यांनी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून चौकशी करण्याची मागणी केल्याने भ्रष्ट अधिकार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

रावेर तालुक्यातील रस्त्यांबद्दल अधिवेशनात तक्रार
नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार शिरीष चौधरी यांनी आदिवासी भागातील रावेर-पाल रस्त्याच्या झालेल्या दयनीय अवस्थेबद्दल तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. विवरा-बलवाडी रस्ता अवघ्या चार महिन्यांपूर्वीच सुमारे सात कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आला मात्र त्यातदेखील निकृष्ट साहित्य वापरून काम झाल्याने त्यातच भ्रष्ट्राचार झाल्याची तक्रार आमदार शिरीष चौधरी यांनी अधिवेशनात केली आहे. मागील आठवड्यात वाघोद्यानजीक सुमारे 18 लाख रुपये खर्च करून पुलाचे काम निकृष्ट पद्धत्तीने सुरू असल्याचे ‘जनशक्ती’ने उघडकीस आणताच काम बंद करण्यात आले होते.

विवरा-बलवाडी रस्ता कामात मोठा भ्रष्टाचार
विवरा-बलवाडी हा प्रमुख जिल्हा मार्ग असलेला रस्ता चार महिन्यापूर्वी नवीन तंत्रज्ञान (सॉईल स्टेबिायझेशन) चा वापर करून तयार करण्यात आला होता.परंतु चार महिन्यात या रस्त्याचे तीन-तेरा झाल्याने सात कोटी रुपये पाण्यात गेल्याचे व या रस्त्यात ठेकेदाराने अधिकार्‍यांशी संगमत करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याची तक्रार अधिवेशनात ऑनलाईन तारांकीत प्रश्न उपस्थित करून तक्रार करण्यात आली आहे. नवीन तंत्रज्ञान (सॉईल स्टेबीलायझेशन) वापरून हा रस्ता करण्यात आला. सुमारे चार कोटी खर्च झाले असून काही ठिकाणी रस्ता खराब झाल्याचे शाखा अभियंता एम.डी.तायडे यांनी सांगितले.