रावेर परिसरात बिबट्याने पाडला गायींचा फडशा

0

रावेर । तालुक्यातील सातपुडा पर्वतात अतिदुर्गम भाग असलेला जिन्सीपासून सुमारे 5-7 किलोमिटर आत जंगलात गायीवर बिबट्याने हल्ला करुन फडशा पाडल्याचे समजते. जिन्सीपासून सुमारे 5 ते 7 किलोमिटर अंतरावर असलेले महामंडलेश्‍वर मंदिराच्या जवळपास गायीवर बिबट्याने हल्ला करुन फडशा पाडला आहे. यामध्ये गायी जागीच ठार झाल्याचे वृत्त असून बिबट्याच्या वावराने परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभागाने केला पंचनामा

यापुर्वी या भागात अतिदुर्गम जंगलात बिबट्याचा वावर असल्याचे काही जणांना दिसून आले होते. सातपुड्यात याआधीसुध्दा वन्यजीव विभागाने जंगलातल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये बिबट्याचे छायाचित्र टिपले होते. या परिसरात शेती असल्यामुळे दिवसभर शेतकरी आपल्या शेतात कामे करीत असतात मात्र बिबट्याच्या अशा प्रकारच्या हल्ल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी दिवसा देखील आपल्या जीवाच्या भितीमुळे शेतात काम करण्यास धजावत नाही. याकडे वनविभागाने लक्ष देऊन परिसरात सुरक्षा वाढविण्यात यावी तसेच बिबट्यांना जेरबंद करण्याची आवश्यकता आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकार्‍यांनी मृत्युमुखी पडलेल्या गायींचा पंचनामा करण्यासाठी गेल्याचे समजते. मात्र शासनाकडून याची नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता आहे.